
मुंबई : मुंबईसह कोकण विभागात सध्या थंडीची सुखद जाणीव होत आहे. उर्वरीत राज्याच्या तुलनेत सध्या कोकणातील कमाल तापमानाचा पारा घसरलेला आहे. पहाटेच्या वेळी राज्यात १५ ते १९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे. मात्र हे तापमान थंडीमध्ये अपेक्षित असलेल्या सरासरी किमान तापमानाहून अधिक आहे. किमान तापमानाचा पारा सरासरीहून केवळ कोकणामध्येच कमी आहे. मंगळवारी ही थंडीची जाणीव अधिक वाढली होती. बुधवारी मुंबईसह उत्तर कोकणात तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.मुंबईत मंगळवारी सांताक्रूझ येथे १४.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथे १७.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. अलिबाग येथे १४.५, डहाणू येथे १५, रत्नागिरी येथे १७.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. कोकण विभागातील किमान तापमानात १.५ ते ३.५ अंशांची सरासरीहून घसरण आहे. येत्या २४ तासांमध्ये मुंबईसह उत्तर कोकणातील किमान तापमानात घट होईल असे अनुमान भारतीय हवामान विभागाने वर्तवले.मुंबईत सांताक्रूझ येथे मंगळवारी २६ तर कुलाबा येथे २५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे ४.७ आणि ४.६ अंशांनी कमी होते. अलिबाग येथे २४.९, डहाणू येथे २३.२ तर रत्नागिरी येथे २७.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची मंगळवारी नोंद झाली. बहुतांश केंद्रांवरील मंगळवारच्या आणि सरासरी तापमान ३ ते ३.५ अंशांचा फरक नोंदला गेला. जळगाव येथेही मंगळवारी पारा उतरून २८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. २६ जानेवारीपर्यंत उर्वरीत महाराष्ट्रात मात्र थंडी कमी जाणवेल, असे अनुमान निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी वर्तवले. गुजरातमार्गे येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पालघर, उत्तर मुंबई आणि ठाण्यावर अधिक परिणाम जाणवतो.आज ढगाळ वातावरणआज, बुधवारी राज्यात ढगाळ वातावरणाचीही शक्यता आहे. पश्चिमी प्रकोपाचा परिणाम सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड येथे आज दिसू शकतो. या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचे अनुमान प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आले आहे. पश्चिमी प्रकोपामुळे उत्तर भारतात बर्फवृष्टी झाल्यानंतर त्याचा परिणाम राज्यातील थंडीवर होऊ शकतो.