
नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड विवाहबंधनात अडकला आहे. ऋतुराज गायकवाडचे आज म्हणजेच ३ जून रोजी उत्कर्षा पवारसोबत लग्न झालं आहे. उत्कर्षा ही देखील महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू आहे. उत्कर्षा पवार गोलंदाजीसह फलंदाजी देखील करते. उत्कर्षा पवारने तिचा शेवटचा सामना नोव्हेंबर २०२१ मध्ये पंजाबविरुद्ध एकदिवसीय ट्रॉफीमध्ये खेळला होता.जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघात ऋतुराज गायकवाडला राखीव खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे. पण त्याआधीच त्याने लग्नामुळे आपलं नाव मागे घेतलं. तत्पूर्वी गुरुवारी महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू उत्कर्षा पवार हिच्यासोबत मेहंदी सोहळा पार पडला. आता त्यांच्या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत.एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलचे पाचवे जेतेपद मिळवून देण्यात गायकवाडने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गायकवाडने सातत्यपूर्ण फलंदाजी करत सीएसकेसाठी ५९० धावा केल्या. दरम्यान, उत्कर्षा पवार ही देखील महाराष्ट्रासाठी क्रिकेट खेळलेली आहे. २४ वर्षीय उत्कर्षा ही वेगवान गोलंदाजीसह अष्टपैलू खेळाडू आहे. उत्कर्षाने १८ महिन्यांपूर्वी शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ती पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्सेसमध्ये शिकत आहे.ऋतुराज गायकवाड भविष्यात भारतीय क्रिकेटचा एक महान खेळाडू बनू शकेल. ऋतुराजने आयपीएल २०२१ मध्ये देखील चेन्नईसाठी ६३५ धावा करून ऑरेंज कॅप मिळवली होती. महेंद्रसिंग धोनीनंतर ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सची धुरा सांभाळेल अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.