मुंबई : गणपतीसाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास यंदा विनाखड्ड्यांचा होणार, अशा भूलथापा गेली अनेक वर्षे राजकीय नेत्यांकडून दिल्या जात आहेत. त्यातच मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने, आतातरी आपले हाल संपतील, अशी आशा कोकणवासीयांना होती. पण, यंदा देखील त्यांना खाचखळग्यांमधूनच प्रवास करावा लागणार आहे.मुंबई-गोवा महामार्गच्या चौपादरीकरणाचे रखडले काम आणि जागोजागी असलेल्या खड्ड्यांमुळे कोकणातला प्रवास सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिला आहे. चौपदीकरणानंतरही यातूनही तूर्ततरी सुटका होण्याची शक्यता कमीच आहे. कारण यातील महत्त्वाचा टप्पा असलेला पनवेल पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटरच्या टप्प्यातील कोकणाकडे जाणारी एकच मार्गिका गणेशोत्सवाआधी सुरू करून कोकणात जाणाऱ्या नोकरदारांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. एक मार्गिका सुरू करतानाच मुंबई-गोवा महामार्गतील चौपदरीकरणातील अन्य शेवटचे टप्पेही डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी मुंबई-गोवा पाहणी दौऱ्यात दिली. मात्र, याच पट्ट्यातील कासू ते इंदापूर, माणगावपर्यंत सध्या चौपदरीकरणाचे बंद असलेले काम, रत्नागिरीपर्यंत जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे, वडखळ आणि माणगावला होणारी वाहतूक कोंडी इत्यादी प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे डिसेंबरचे उद्दिष्ट गाठणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यावेळी गणेशोत्सवातील मुंबई-गोवा महामार्गवरील प्रवास खडतर राहणार आहे.सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी मुंबई-गोवा चौपदारीकरणाच्या कामाची पाहणी केली. पनवेल पळस्पेपासून या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), सार्वजनिक बांधकाम विभागासह रस्त्याची कामे पाहणारे कंत्राटदारही सोबत होते. यावेळी चव्हाण यांनी या सर्वांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. मुंबई-गोवा महामार्गवर ३५६ किलोमीटरच्या पट्ट्यात चौपदरीकरण ११ टप्प्यांत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाच टप्प्याची कामे ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहेत.यामध्ये महत्त्वाचे असलेले पनवेल पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटरच्या पट्ट्यात चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. यातील पनवेल पळस्पेपासूनचा ४२ किलोमीटरचा रस्ता सुस्थितीत असून, यापैकी १२ किलोमीटर रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कासूपासून पुढील इंदापूरपर्यंतचा रस्ता नवीन तंत्रज्ञान वापरून पूर्ण केला जाणार असल्याचे चव्हाण म्हणाले. त्यामुळे पनवेल पळस्पे ते इंदापूर दिशेने जाणारी अशी एक मार्गिका गणपती आधी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुंबई-गोवा संपूर्ण मार्गाचे चौपदरीकण येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती दिली.मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर टप्प्यातील पनवेल ते कासू या ४२ किमी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते मार्चमध्ये करण्यात आला होता. त्यानंतरही कामाला वेग मिळालेला नाही.