
पालघर : नायगाव पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या नवीन उड्डाणपुलाला अवघ्या वर्षभरातच मोठा तडा गेला आहे. या पुलाच्या पश्चिमेच्या उतारावर हा तडा गेला असून त्याची तात्काळ दुरुस्ती न केल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी वर्तवली आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.नायगावचा उड्डाणपूल बांधकामाला सुरुवात झाल्यापासूनच चर्चेत आहे. तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा पूल बांधून पूर्ण झाला; मात्र या पुलाचे अधिकृत उद्घाटन अद्याप झालेले नाही. त्यामुळे गेल्या वर्षी उद्घाटन आणि नामकरणाचे नाट्य विविध पक्षांमध्ये चांगलेच रंगले होते. त्यानंतर आता या पुलाच्या उताराला मोठा तडा गेल्याने हा पूल पुन्हा चर्चेत आला आहे. नायगाव पूर्व येथे मुंबई-अहमदाबाद महामार्ग अगदी जवळ असल्याने नायगाव पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल तयार करावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून वसईकरांकडून करण्यात येत होती. अखेर सरकारतर्फे मान्यता मिळाल्यानंतर, २०१५मध्ये या पुलाचे काम एमएमआरडीएतर्फे सुरू करण्यात आले होते. सुरुवातीच्या तीन वर्षांत या पुलाच्या कामात अनेक अडथळे आले होते. त्यामुळे संथगतीने काम सुरू होत, आठ वर्षांनंतर मागील वर्षी हा पूल बांधून तयार झाला होता. या पुलामुळे वसई, नायगाव येथून मुंबईला जाण्यासाठी महामार्गावर येण्यासाठी लागणारा वळसा वाचला आहे. अधिकृत उद्घाटन झालेले नसले, तरी हा पूल वाहतुकीसाठी खुला आहे. महामार्गावर जाण्यासाठी या पुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. या पुलाच्या पश्चिमेच्या बाजूला दोन उतार आहेत. यापैकी एक उतार हा अगदी रेल्वे स्थानकाला लागून असल्याने तो वाहतुकीसाठी बंद आहे. मात्र या ठिकाणी वाहनांचे पार्किंग करण्यात येत आहे. याच उताराच्या सुरुवातीला पुलाच्या बाजूला मोठा तडा गेला आहे. येथे लावलेले सिमेंटचे ब्लॉक एकमेकांपासून विलग होत असल्याचे दिसत आहे. हा उतार वाहतुकीसाठी खुला असता, तर मोठी दुर्घटना घडण्याची भीती वसईतील स्थानिक निखिल राऊत यांनी वर्तवली.जेमतेम वर्षभरातच या पुलाची परिस्थिती खराब होत असल्याने, या पुलाच्या कामाच्या दर्जावर वसईकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करण्यासह संपूर्ण पुलाची चाचणी एमएमआरडीएने तात्काळ करावी, अशी मागणी वसई-विरारमधील नागरिकांनी केली आहे.