
मुंबई : बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यातील एसी बसची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उपक्रम आणखी २५० सिंगल डेकर एसी बस ताफ्यात दाखल करणार आहे. त्यासाठी बुधवारी निविदा जारी केली जाणार आहे. या बस १२ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतल्या जातील. त्यासाठी १ हजार ३२३ कोटी रुपयांहून अधिक खर्च बेस्ट उपक्रमाला मोजावा लागणार आहे.बारा मीटरच्या २५० सिंगल डेकर एसी बससाठी निविदा भरण्याची अंतिम मुदत ही १७ ऑक्टोबर २०२३पर्यंत आहे. भाडेतत्त्वावर या बस दाखल करतानाच त्यासोबत कंत्राटादाराकडून चालकही उपलब्ध केला जाणार आहे. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकूण २ हजार ९७८ बस आहेत. यापैकी भाडेतत्त्वावरील १ हजार २७९ एसी बस आहेत. यामध्ये बेस्टच्या मालकीच्या केवळ २५ बस आहेत. भविष्यात फक्त एसी बस चालवण्याचे उद्दिष्ट उपक्रमाने ठेवले आहे. येत्या काही महिन्यांत भाडेतत्त्वावर २ हजार १२४ एसी बस दाखल केल्या जाणार आहेत. यासाठी निविदा काढून ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला कामही दिले आहे. त्याव्यतिरिक्त या २५० एसी बस असल्याची माहिती बेस्ट उपक्रमातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सन २०२७पर्यंत बेस्ट बसचा ताफा दहा हजारांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.