
नाशिक: नाशिकमध्ये गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले असून गणेश विसर्जना दरम्यान मूर्ती विसर्जन करताना दोन जण बुडाल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकच्या गोदावरी नदीत गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेले नदीच्या पाण्यात बुडाले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून नाशिक शहरासह राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जात होता. परंतु नाशिकमध्ये अखेरच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. गोदावरी नदीत विसर्जन करताना दोन जण बुडाले आहेत. तर वालदेवी धरणात तीनजण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. वालदेवी धरणात दोन महाविद्यालयीन युवकांसह एक विवाहित तरुण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व बुडालेल्यांचा प्रशासनाकडून शोध घेण्याचे काम देखील सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापनाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून गणेश विसर्जन करताना बुडालेल्यांचा शोध घेतला जात आहे. महापालिकेचे जीव रक्षक कर्मचारी यांच्याकडून या बुडालेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन देखील युद्ध पातळीवर राबवले जात आहे. नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जना दरम्यान बुडालेल्या युवकांबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही. परंतु वालदेवी धरणात विसर्जन करताना तीन जण तर गोदावरी नदीत विसर्जन करताना दोन जण बुडाल्याची प्राथमिक माहिती ही सूत्रांनुसार समोर आली आहे. या सर्वांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाकडून गणेश विसर्जनाला कुठल्याही पद्धतीचे गालबोट लागणार नाही, याची सर्वतोपरी खबरदारी घेतली जाते. परंतु गणेश उत्सवाचा अति उत्साह देखील तरुणांच्या जीवावर बेतू शकतो.