सुप्रीम कोर्टाकडून कानउघडणी, आमदार अपात्रता सुनावणीला मुहूर्त; शिंदे आणि ठाकरेंची धाकधूक वाढली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 25, 2023

सुप्रीम कोर्टाकडून कानउघडणी, आमदार अपात्रता सुनावणीला मुहूर्त; शिंदे आणि ठाकरेंची धाकधूक वाढली

https://ift.tt/WNuLOFl
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याचे भिजत घोंगडे ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले होते. त्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे. विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सुनावणीकडे लक्ष आहे. विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता होणाऱ्या या सुनावणीसाठी ठाकरे गटाच्या १४, तर शिंदे गटाच्या ३९ आमदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीसाठी कोण कोण हजर राहते, याबाबतही उत्सुकता आहे.राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा न्यायालयात गेल्यानंतर आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभाध्यक्षांच्या दरबारी निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर १४ सप्टेंबरला सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीदरम्यान शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या याचिका मिळाल्या नसल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे त्यांना या याचिकांचा अभ्यास करण्याचा वेळ देताना अध्यक्षांनी १७ दिवस पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली होती. त्यातच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान नार्वेकर यांच्यावर विलंबावरून ताशेरे ओढण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या या सुनावणीबाबत राजकीय पक्षांनी भाष्य केले आहे. 'सुनावणीसाठी आम्हाला नोटिसा मिळाल्या असून, आम्ही आमच्या वकिलांसह दुपारी तीन वाजल्यापासून हजर राहणार आहोत,' असे ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी यांनी स्पष्ट केले. या सुनावणीसाठी दोन्ही गटाचे आमदार आपल्या दोन-दोन वकिलांसह उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. अपात्रतेआधी पक्ष कुणाचा यावर अध्यक्ष काय निर्णय देतात, याकडेही लक्ष आहे. ठाकरे गटाकडून जून २०२२मध्ये अस्तित्वात असलेला पक्ष आणि प्रतोद हा मुद्दाच लावून धरला जाणार आहे. तर शिंदे गटाकडून विधिमंडळात बहुमत असलेला पक्षच शिवसेना असल्याचा आणि निवडणूक आयोगाच्या निकालाचा दाखला दिला जाईल, असे सांगितले जाते.