
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या (डीएफसी) नवीन दोन मार्गिका उभारण्यासह पनवेल यार्डाच्या रिमॉडलिंगसाठी ३८ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे. आज, शनिवारी रात्री ११ ते सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार असून या कालावधीत पनवेल-बेलापूर आणि पनवेल-ठाणे लोकलसेवा बंद राहणार आहे. पनवेल मार्गावरील अप-डाउन हार्बर मार्गिकांसह डीएफसी मार्गिकांच्या जोडणीचे काम दीड दिवसांहून अधिक असलेल्या ब्लॉकमध्ये करण्यात येणार आहे. बेलापूर-पनवेल आणि ठाणे-पनवेलदरम्यान लोकल फेऱ्या रद्द राहणार असल्याने प्रवाशांच्या सुविधेसाठी ब्लॉक कालावधीत अतिरिक्त बसगाड्या चालवाव्यात, अशी सूचना मध्य रेल्वेने नवी मुंबई महापालिकांना केली आहे.प्रदीर्घ ब्लॉकचा परिणाम:- हार्बर-ट्रान्स हार्बरवरील बेलापूर-पनवेल आणि ठाणे-पनवेलदरम्यान अप-डाउन लोकलसेवा रद्द राहणार आहे.- हार्बर मार्गावरील काही लोकल बेलापूर, नेरुळ, वाशीपर्यंतच धावणार आहेत. या लोकल त्याच स्थानकातून चालवण्यात येणार आहेत.आजच्या शेवटच्या लोकलचे वेळापत्रक:सीएसएमटी-पनेवल- रात्री ९.०२पनवेल-सीएसएमटी- रात्री १०.३५ठाणे-पनवेल- रात्री ९.३६पनवेल-ठाणे- रात्री ९.२०ब्लॉकनंतर सोमवारच्या पहिल्या लोकलचे वेळापत्रकसीएसएमटी-पनवेल लोकल- दुपारी १२.०८पनवेल-सीएसएमटी लोकल- दुपारी १.३७ठाणे-पनवेल लोकल- दुपारी १.२४पनवेल-ठाणे लोकल- दुपारी २.०१एसटीला वगळले:दीड दिवसांपेक्षा अधिक कालावधीच्या ब्लॉकमुळे स्थानिक महापालिका प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त बसगाड्या चालवाव्यात, अशा सूचना रेल्वेने पत्राद्वारे केली आहे. मात्र या पत्रात एसटी महामंडळाचा उल्लेख नाही. या दोन्ही मार्गांवर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा टक्का मोठा आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता एसटी महामंडळाला नियमित बसगाड्यांसह अतिरिक्त बसगाड्या चालवण्यासाठी सूचना देण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री ब्लॉक:वसई रोड ते भाईंदरदरम्यान शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ३.३० अप जलद आणि मध्यरात्री १.१५ ते पहाटे ५.१५ वाजेपर्यंत डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.मुख्य मार्गावर ब्लॉक नाही:३८ तासांच्या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान मुख्य मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.