
लोणावळा, पुणे : गणरायाचे आगमन झाल्यापासून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेकजण गणेश उत्सवासाठी आपल्याला गावी आलेले आहेत. त्यामुळे आता गणेश विसर्जन सोहळा अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. घरगुती असणाऱ्या अनेक गणपतींचे विसर्जन देखील झाले आहे. आता गणेश उत्सवाच्या विसर्जनाची तयारीसाठी प्रशासनाकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहराप्रमाणे मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर देखील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. २७ सप्टेंबर मध्यरात्री १२ ते २९ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना एक्स्प्रेसवर बंदी घालण्यात आली आहे. गणपती विसर्जन आणि ईद एकच दिवशी आल्याने प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासोबतच मुंबई-गोवा महामार्गावरही विसर्जनाच्या दिवशी अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन असलेल्या वाहनांची वाहतूक २८ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून ते २९ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार असल्याचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.