
नागपूर: ‘तत्वज्ञान सर्वांकडे आहे. पण ते प्रत्यक्षपणे जगणे आणि ते सांगणाऱ्या महापुरुषांची परंपरा केवळ भारतात आहे. त्यामुळे अडलेल्या जगाला पथप्रदर्शन करण्याचे कार्य हे भारताचे कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केले. श्री शांतीपुरुष सेवा संस्थेतर्फे नानामहाराज तराणेकर यांच्या सपाद जन्मशताब्दी (१२५ वर्षे) सोहळ्याच्या समारोपीय महोत्सवाचा उद्घाटन सोहळा रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे विशेष अतिथी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, श्री शांतीपुरुष सेवा संस्थेचे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबामहाराज तराणेकर, कार्याध्यक्ष राजीव हिंगवे आणि तेजस तराणेकर यांची उपस्थिती होती. सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले,‘आपली परंपरा ही सनातन आहे. तेव्हाच्या काळात गवसलेल्या तत्वांची शिकवण देण्याचे कार्य आपल्या साधूसंतांनी केले आहे. सर्वांकडे तत्वज्ञान आहे. सर्वांकडे मोक्ष अथवा मुक्ती ही संकल्पना आहे. पण प्रत्यक्षात तत्वज्ञान जगणारे आणि रामकृष्ण परमहंस यांच्याप्रमाणे इतरांना त्याची प्रचिती देणाऱ्या महापुरुषांची परंपरा आपल्याकडे असून संपूर्ण जगाला मार्ग दाखविण्याचे कार्य आपले कर्तव्य आहे. स्वत:ला उन्नत करा, अहंकार सोडा आणि जगाशी एकात्म व्हा; हीच जीवनाची रित आहे. हेच कार्य आपल्या संतांनी केले. भलेही या उद्दीष्टापर्यंत पोहचण्यासाठी असलेले मार्ग वेगवेगळे असतील पण गंतव्य सर्वांचे एकच राहिले आहे. हीच स्थिती अध्यात्म आणि विज्ञानाची देखील आहे. मात्र, केवळ अहंकारामुळे या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अन्यथा विज्ञाननिष्ठतेशिवाय अध्यात्म शक्य नाही आणि अध्यात्मनिष्ठतेशिवाय विज्ञान उमगू शकत नाही, हेच सत्य आहे, असे ते म्हणाले.