Lok Sabha Results: धैर्यशील मानेंनी 'धैर्या'ने खेचून आणला विजय; २ वेळा खासदार राहिलेल्या राजु शेट्टींवर ओढावली नामुष्की - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 5, 2024

Lok Sabha Results: धैर्यशील मानेंनी 'धैर्या'ने खेचून आणला विजय; २ वेळा खासदार राहिलेल्या राजु शेट्टींवर ओढावली नामुष्की

https://ift.tt/9MfeLQG
कोल्हापूर, नयन यादवाड: राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या 'हातकणंगले लोकसभा मतदारसंघा'मध्ये अटीतटीच्या झालेल्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी दुसऱ्यांदा विजय खेचून आणला. त्यांनी हातकणंगलेवर माने कुटुंबीयांचे वर्चस्व कायम ठेवला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी देण्यापासून ते प्रचाराच्या शेवटच्या दिवसांपर्यंत कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तळ ठोकून बसले होते. त्यांनी जुळवलेली राजकीय गणिते अखेर यशस्वी ठरली आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांचा १४,७२३ मतांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचा ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव करत धैर्यशील माने यांनी विजय मिळवला आहे.मतदारसंघात अनपेक्षित निकाल राज्यात लोकसभा निवडणुकीत एका बाजूला महाविकास आघाडीला मोठ यश प्राप्त झाले, तर पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पार पडली. सुरुवातीपासूनच सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने शेट्टीनी अखेर 'एकला चलो'चा दिला. ते या निवडणुकीत अपक्ष उतरले होते. यामुळे ऐनवेळी ठाकरे गटाचा निष्ठावंत आमदार म्हणून ओळख असलेले शाहुवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली. या मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक दोन नंबरचे मतदान झाले. मतदानानंतर आलेले एक्झिट पोल सरूडकर यांच्या बाजूने होते. मात्र सर्व एक्झिट पोलना फोल ठरवत या मतदारसंघात अनपेक्षित निकाल लागला. धैर्यशील मानेचा "धैर्य" राखून विजय हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून रोजी शिवाजी विद्यापीठासमोरील राजाराम तलाव परिसरातील जलसंपदा विभागाच्या गोदामामध्ये पार पडली. सुरूवातीपासूनच सत्यजित पाटील सरूडकर हे थोड्या फरकाने का असेना पण सातत्याने आघाडीवर होते. त्यांनी शाहुवाडी, पन्हाळा, शिराळा वाळवा या मतदारसंघातून बाराव्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली होती. बाराव्या फेरीअखेर सत्यजित पाटील-सरूडकर हे ६२९० मतांनी आघाडीवर होते. मात्र तेराव्या फेरीला वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आणि चौदाव्या फेरीत त्यांचे हे मताधिक्य निम्म्यावर आले. सोळाव्या फेरीपर्यंत मानेंनी परिस्थिती बदलून टाकत आघाडी घेण्यास सुरुवात केली. सोळाव्या फेरीअखेर धैर्यशील माने ७३५१ मतांनी आघाडीवर आले. यानंतर त्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत हे मताधिक्य सोडले नाही. अठराव्या फेरीअखेर माने यांनी १२ हजार ११८ मतांनी आघाडी घेतली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. माने यांचा बालेकिल्ला असलेल्या रुकडी गावात आणि रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी कार्यकर्ते जमू लागले. मतमोजणीच्या अखेरीस माने यांनी सरूडकरांना तब्बल १४,७२३ मतांनी पराभूत करत विजय मिळवला. राजू शेट्टींचा निर्णय चुकला शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर शिंदेंसोबत विद्यमान खासदार धैर्यशील माने गेल्याने येथे उमेदवारी कोणाला द्यायची असा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर होता. या मतदारसंघात दोन वेळा खासदार राहिलेले माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू होती. मात्र शेवटच्या क्षणी ही चर्चा फिस्कटल्याने राजू शेट्टी यांनी अपक्ष निवडणूक लढवली, याचा फटका माजी स्वत: शेट्टी यांनाही बसला. ते मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच पिछाडीवर होते. अखेरपर्यंत ते प्रचंड फरकाने मारे पडले. ते सरूडकर यांच्यापेक्षा ३ लाख मतांनी मागे राहिले. विशेष म्हणजे शिरोळ तालुका हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण याच बालेकिल्ल्यातून धैर्यशील माने यांनी ५ हजार ७०० मतांनी आघाडी घेतली. इचलकरंजीतूनही माने यांनी सर्वाधिक ३८ हजार ४००, हातकणंगलेतून १७ हजार ४७२ मतांनी आघाडी मिळवली आहे. तर वाळवा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांनी १७ हजार, शिराळामधून ९ हजार तर पन्हाळा शाहूवाडीतून १८ हजार ९८० मताधिक्य मिळवले. यामध्ये सर्वच विधानसभा मतदारसंघातून राजू शेट्टी पिछाडीवर राहिले.