
पावसाळ्यामध्ये डोंगरातून कोसळणारे धबधबे, हिरवीगार दऱ्या आणि ढगांनी भरलेले रस्ते एखाद्या स्वर्गापेक्षा कमी वाटत नाहीत. या दिवसात घराबाहेर पडून निसर्गाच्या जवळ जाण्याची इच्छा होते, पण फिरायला जायचं म्हणजे खिशात चांगले पैसेही पाहिजेत. पण काळजी करू नका! भारतात अशी अनेक सुंदर ठिकाणं आहेत जिथे तुम्ही फक्त 5,000 रुपयांच्या बजेटमध्येही मनसोक्त फिरू शकता. चला जाणून घेऊया अशा पाच स्वस्त पावसाळी ठिकाणांबद्दल, जी फक्त स्वस्तच नाहीत तर निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्ग आहेत.
1. लॅन्सडाउन, उत्तराखंड
जर तुम्हाला याच महिन्यात प्रवासाला जायचे असेल, तर तुम्ही उत्तराखंडच्या लॅन्सडाउनची सहल करू शकता. हलक्या पावसाच्या वातावरणात ही जागा खूपच आल्हाददायक होते. दिल्लीपासून लॅन्सडाउनचे अंतर सुमारे 250 किमी आहे. तुम्ही बसने सहज येथे पोहोचू शकता आणि स्वस्त हॉटेल्स किंवा होम स्टेमध्ये राहू शकता. स्थानिक जेवणाचा आस्वाद घेऊन तुमचा खर्च खूप कमी होईल. दिल्लीहून लॅन्सडाउनचा प्रवास फक्त 2 ते 2.5 हजार रुपयांमध्ये होऊ शकतो.
2. मांडू, मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातील मांडू हे ऐतिहासिक वारसा आणि हिरवळ यांचा संगम आहे. येथे तुम्ही जुलै ते मार्च या काळात कधीही येऊ शकता. पावसाळ्यात मांडूमधील ऐतिहासिक किल्ल्यांची आणि राजवाड्यांची सुंदरता आणखी वाढते. दिल्ली किंवा इतर ठिकाणांहून तुम्ही रेल्वेने मांडूला जाऊ शकता. राहणे आणि स्थानिक जेवणासह तुमची मांडूची ट्रिप सुमारे 4,500 रुपयांमध्ये पूर्ण होऊ शकते.
3. भीमताल आणि नौकुचियाताल, उत्तराखंड
उत्तराखंडचे नैनिताल खूप लोकप्रिय असल्यामुळे येथे खूप गर्दी असते. पण तुम्हाला नैनितालसारख्या शांत आणि कमी गर्दीच्या ठिकाणी जायचे असेल, तर तुम्ही भीमताल किंवा नौकुचियातालला जाऊ शकता. येथे तुम्ही शांतपणे वेळ घालवू शकता, बोटिंग करू शकता, ट्रेकिंग करू शकता आणि पावसाचा आनंद घेऊ शकता. कमी बजेटमध्ये ‘मिनी-हनिमून’साठी ही जागा एकदम योग्य आहे.
4. चिखलदरा, महाराष्ट्र
महाराष्ट्रातील खंडाळा, महाबळेश्वर किंवा लोणावळा पावसाळ्यात खूप प्रसिद्ध आहेत. पण त्याच सौंदर्याचा आनंद कमी पैशात घ्यायचा असेल तर तुम्ही चिखलदऱ्याला जाऊ शकता. चिखलदरा विदर्भामधील एकमेव हिल स्टेशन आहे, जे अमरावती जिल्ह्यात आहे. पावसाळ्यात येथे कॉफीची मळे आणि सुंदर धबधबे दिसतात. स्थानिक बस किंवा ट्रेनने तुम्ही कमी खर्चात आरामदायक प्रवास करू शकता.
5. टिहरी झील, उत्तराखंड
उत्तराखंडमधील टिहरी झीलला भेट देण्यासाठी मार्च ते जून आणि सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ उत्तम असतो. या काळात हवामान खूप आल्हाददायक असते आणि तुम्ही येथे बोटिंग, कॅम्पिंग आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता. सर्व खर्च मिळून प्रति व्यक्ती सुमारे 5,000 रुपयांपर्यंत खर्च येईल. पावसाळ्यात येथील डोंगर आणि सरोवराचे दृश्य खूपच मनमोहक असते.