Sunil Gavaskar : मुंबई क्रिकेट असोसिएशन माझ्यासाठी…, लिटील मास्टर Mca बाबत काय म्हणाले? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 24, 2025

Sunil Gavaskar : मुंबई क्रिकेट असोसिएशन माझ्यासाठी…, लिटील मास्टर Mca बाबत काय म्हणाले?

Sunil Gavaskar : मुंबई क्रिकेट असोसिएशन माझ्यासाठी…, लिटील मास्टर Mca बाबत काय म्हणाले?

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये आज 23 ऑगस्ट रोजी ‘एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचे’ उद्घाटन करण्यात आले. एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे संग्रहालय उभारण्यात आलं. शरद पवार यांचं भारतीय आणि मुंबई क्रिकेटमध्ये भरीव योगदान राहिलं आहे. या योगदानासाठी एमसीएच्या या संग्रहालयाला शरद पवार यांचं नाव देण्यात आलं. तसेच या संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भारताचे माजी कर्णधार, सर्वांचे लाडके लिटील मास्टर अर्थात सुनील गावस्कर आणि आयसीसी-बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे पुतळेही उभारण्यात आले. यावेळेस या दिग्गजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

या विशेष कार्यक्रमात 2 दिग्गजांनी मनोगत व्यक्त करताना एमसीएच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळेस गावसकरांनी बोलताना एमसीएला त्यांच्या आईची उपमा दिली. गावसकर काय म्हणाले? हे सविस्तर जाणून घेऊयात.

गावसकर काय म्हणाले?

“माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. मी या सन्मानाने भारावून गेलो आहे. असा सन्मान प्रत्येकालाच मिळत नाही. मी याधीही म्हटलंय की मुंबई क्रिकेट असोसिएशन माझ्या आईसारखी आहे. मी शालेय स्तरावर खेळायची सुरुवात केली. तसेच बॉम्बे स्कूलसाठी खेळलो, तेव्हापासून मला एमसीएची साथ मिळाली. मी त्यानंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेतही खेळलो. मुंबईसाठी खेळण्याची संधी मिळाली हे माझं सौभाग्य आहे. तसेच  माझ्यासाठी ही सन्मानाची बाब आहे”, असं गावसकरांनी म्हटलं.

सुनील गावसकरांनी कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार आणि फलंदाज म्हणून असंख्य विक्रम केले. गावसकरांच्या निवृत्तीच्या अनेक दशकानंतरही ते विक्रम अबाधित आहेत. गावसकरांनी कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. या 10 हजार धावा पूर्ण केल्यानंतरची गावसकरांची जी पोज होती, त्यानुसार हा पुतळा साकारण्यात आला आहे. गावसकरांनी त्यांच्या या पुतळ्याबाबतही प्रतिक्रिया दिली.

“हा पुतळा मला त्या खास क्षणाची आठवण करुन देतो जेव्हा मी 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. या पुतळ्यामुळे माझ्या आठवणींना उजाळा मिळाला”, असं गावसकरांनी नमूद केलं.

एमसीएचे आभार

“क्रिकेटपटू कसे घडले आणि ते घडण्याचाच प्रवास हा सगळ्यांना समजायला पाहिजे. त्यासाठी या ठिकाणी संग्रहालय पाहिजे होतं. ते तुम्ही केलंत त्याबद्दल खुप धन्यवाद”, अशा शब्दात सुनील गावसकर यांनी एमसीएचे आभार मानले.