
बिग बॉस 19 मध्ये आता नवनवीन ट्वीस्ट येत आहेत. प्रेक्षकही आता हा शो एन्जॉय करू लागले आहेत. पण स्पर्धक आणि प्रेक्षक सर्वात आतुरतेनं वाट पाहतातते विकेंड का वारची जो की शनिवार आणि रविवार सलमान खानसोबत असतो. प्रत्येक वीकेंड प्रेक्षकांसाठी खास असतो. 6 सप्टेंबरच्या विकेंड का वारमध्ये सलमान खानने घरच्यांची चांगलीच शाळा घेतली. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून फटकारलं.
सलमान खानने घरच्यांना अन्नावरून चांगलंच झापलं
त्यानंतर 7 सप्टेंबरच्या विकेंडच्या वारमध्ये देखील सलमान खानने घरच्यांना एका गोष्टीवरून चांगलंच झापलेलं पाहायला मिळालं. ते म्हणजे अन्न वाया घालवणे. घरातील सदस्यांचा जेवणाबद्दलचा बेफिकीर दृष्टिकोन न पटणारा होता ज्यासाठी सलमान खानने घरातील सर्व सदस्यांना फटकारलं.
एक चमचा पोहेही वाया घालवणे चुकीचे आहे
बिग बॉसचा प्रत्येक चाहता ‘वीकेंड का वार’ ची वाट पाहत असतो कारण संपूर्ण आठवड्यातील घटनांचा फिडबॅक या एपिसोड्समध्ये सलमान खानकडून ऐकायला मिळतो. 7 सप्टेंबरच्या एपिसोडच्या सुरुवातीला सलमान खानने घरातील सदस्यांशी त्यांच्या वागण्या-बोलण्याबद्दल आणि कामाबद्दल बोलले, पण अचानक त्याने घरात अन्न वाया घालवण्याबद्दलचा गंभीर मुद्दाही उपस्थित केला. सलमान म्हणाला की घरातील सदस्य दररोज जेवणाबद्दल तक्रार करतात, पण तरीही ते नीट जेवत नाहीत. त्याने विशेषतः फराहनाचे नाव घेतले आणि सांगितले की तिने एक चमचा पोहेही वाया घालवणे चुकीचे आहे.
सलमानला राग अनावर
शो दरम्यान सलमानचा राग पाहून इतर स्पर्धकही गप्प बसले. सलमान म्हणाला की, “बिग बॉसच्या घरात राहून जर सर्वात मोठा धडा शिकता येईल तर तो म्हणजे अन्नाचे महत्त्व समजून घेणे. बाहेर लाखो लोक आहेत ज्यांना दिवसाला दोन वेळचे जेवणही मिळत नाही आणि इथे लोक सहजपणे अन्न फेकून देतात. हे बरोबर नाही. अन्नचा अनादर होता कामा नये. आम्ही स्वत: जेवताना बोटेही चाटून-पुसून जेवण करतो. एकही कण वाया घालवत नाही.” तसेच सलमान खानने बोलताना उत्तराखंड आणि पंजाबमध्ये आलेल्या भयानक पुराचा देखील उल्लेख केला. तिथली अवस्था समजावून सांगितली तसेच. तिथल्या लोकांना मदत करणार असल्याचंही तो म्हणाला.
पूरग्रस्तांबद्दल काय म्हणाला सलमान?
पूरग्रस्त भागातील हजारो कुटुंबांनी आपली घरे गमावली आहेत आणि अनेक दिवसांपासून उपाशी आहेत आणि फक्त मदत साहित्यावर जगत आहेत. सलमानचे बोलणे ऐकल्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावरही गंभीरता दिसून आली. सलमान म्हणाला की, “जेव्हा बाहेरील लोकांना उपाशी झोपावे लागते तेव्हा येथे घरात होणारी अन्नाची नासाडी पाहून मनाला खूप वेदना होतात. हे फक्त अन्न नाही तर एखाद्याचे जीवन आहे. तुम्ही याचे कौतुक करायला हवं, आभार मानायला हवे”
मदतीचे आवाहनही केले
सलमान खानने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहनही केले आहे. तो म्हणाला की, “छोटीशी मदत देखील एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. तसेच बिग बॉसचे व्यासपीठ केवळ मनोरंजनासाठी नाही तर ते समाजातील महत्त्वाचे प्रश्न पुढे आणण्याचे माध्यम आहे. त्यामुळे आम्ही देखील त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करणार आहोत”