
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पुन्हा एकदा मोठी धमकी देत म्हटले आहे की, ही माझी शेवटची चेतावणी आहे, जर आता ऐकले नाही तर अत्यंत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे जगातील काही युद्ध रोखण्याचे काम करत असल्याचे दाखवत आहेत. मात्र, यामागे त्यांचा स्वार्थ असल्याचे स्पष्ट दिसतंय. यापूर्वी त्यांनी युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये मध्यस्थी करत असल्याचे जाहीर केले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्यास सुरूवात केल्यानंतर हे युद्ध कमी व्हायचे सोडून अधिकच भडकल्याचे बघायला मिळतंय. भारतालाही टॅरिफच्या मुद्द्यावर धमकावताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट करत म्हटले की, इस्रायलने माझ्या अटी मान्य केल्या आहेत. आता हमासनेही सहमती दर्शवण्याची वेळ आलीये. मी हमासला इशारा दिला आहे की, जर त्यांनी अटी मान्य केल्या नाहीत तर त्यांना नक्कीच गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा माझा शेवटचा इशारा आहे. आता दुसरे काहीच होणार नाही. ट्रम्प यांनी शनिवारी हमाससमोर एक नवीन युद्धबंदी प्रस्ताव ठेवला असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले.
नवीन प्रस्तावानुसार, हमासला युद्धबंदीच्या पहिल्या दिवशी 48 लोकांना सोडावे लागेल, त्या बदल्यात इस्रायलमध्ये बंदिस्त हजारो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका होईल. यादरम्यानच गाझापट्टीमध्ये युद्ध बंदी करण्यावर चर्चा होईल आणि मार्ग काढला जाईल. यावर बोलताना एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, इस्रायलकडून डोनाल्ड ट्रम्पच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जात आहे. परंतु त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले आहे.
दुसरीकडे युक्रेनवर हल्ला केल्याने आता डोनाल्ड ट्रम्प हे थेट रशियाच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. हेच नाही तर त्यांनी दोन्ही देशांना एकत्र येऊन चर्चा करण्यास सांगितले होते. मात्र, रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसवण्यासाठी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा मोठा गेम डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यामुळे युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चा होऊ शकत नाही. आता रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असे थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.