-
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या जिल्ह्यातील खर्शी गावातील शेतकरी केशव शिंदे यांनी आपल्या शेतातील एका झाडाची किंमत तब्बल पाच कोटी रुपये असल्याचा दावा केला होता.
-
पण, शास्त्रीय तपासणीमध्ये हे झाड रक्तचंदनाचे नसून केवळ ११ हजार रुपये किमतीचे बीजासाल प्रजातीचे असल्याचं निष्पन्न झालं आहे. या घटनेमुळे आता कोर्टात एक नवीन वादळ निर्माण झालं आहे.
-
वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी शेतकरी केशव शिंदे यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. या जमिनीचा मोबदला त्यांना मिळाला. पण झाडे आणि भूमिगत पाइपलाइनचा मोबदला नाकारण्यात आला.
-
त्यामुळे संतप्त होऊन शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने सुरुवातीला रेल्वेला शिंदे यांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. त्यातील ५० लाख रुपये शिंदे यांना तात्काळ मिळाले, तर उर्वरित रक्कम झाडाच्या मूल्यांकनानंतर देण्याचा निर्णय झाला.
-
न्यालयाच्या आदेशानुसार, झाडाची तपासणी करण्यासाठी बंगळूरू येथील एका संस्थेला पाचारण करण्यात आले. संस्थेने केलेल्या तपासणीनंतर जो अहवाल सादर केला, तो सर्वांसाठी धक्कादायक होता. अहवालानुसार, शेतकरी शिंदे यांनी दावा केल्याप्रमाणे हे झाड रक्तचंदनाचे नसून, ते बीजासाल (Pterocarpus marsupium) प्रजातीचे आहे. याची बाजारपेठेतील किंमत फक्त ११ हजार रुपये आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले.
-
या अहवालाच्या आधारे रेल्वेने आता न्यायालयात एक नवीन अर्ज दाखल केला आहे. शेतकऱ्याने घेतलेली संपूर्ण रक्कम व्याजासहित परत करावी, अशी मागणी रेल्वेने केली आहे. तर दुसरीकडे, शेतकरी केशव शिंदे अजूनही आपल्या दाव्यावर ठाम आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, हे झाड रक्तचंदनाचेच आहे आणि त्याची किंमत पाच कोटी रुपयेच आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागतो, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे.





