SA vs BAN : दक्षिण आफ्रिकेचा सलग दुसरा विजय, टीम इंडियानंतर बांगलादेशचाही 3 विकेट्सने पराभव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 14, 2025

SA vs BAN : दक्षिण आफ्रिकेचा सलग दुसरा विजय, टीम इंडियानंतर बांगलादेशचाही 3 विकेट्सने पराभव

SA vs BAN : दक्षिण आफ्रिकेचा सलग दुसरा विजय, टीम इंडियानंतर बांगलादेशचाही 3 विकेट्सने पराभव

दक्षिण आफ्रिकेने आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 14 व्या सामन्यात बांगलादेशवर 3 विकेट्सने मात केली आहे. दक्षिण आफ्रिकेने यासह स्पर्धेतील एकूण तिसरा तर सलग 3 विकेट्सने दुसरा सामना जिंकला आहे. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेसमोर 233 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेची विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली. मात्र त्यानंतर बांगलादेशने झटपट झटके दिले. त्यामुळे टीम अडचणीत सापडली होती. मात्र मिडल आणि लोअर ऑर्डरमधील फलंदाजांनी चोखपणे भूमिका बजावत दक्षिण आफ्रिकेला विजयी केलं. दक्षिण आफ्रिकेने 3 बॉलआधी आणि 7 विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने 49.3 ओव्हरमध्ये 235 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियाला मागे टाकत तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

बांगलादेशकडून झटके आणि दक्षिण आफ्रिकेचं कमबॅक

बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला 3 धावांवर पहिला झटका दिला. तांझीम बिट्सला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. कॅप्टन लॉरा वोल्वार्ड 31 धावा करुन माघारी परतली. या विकेटपासून दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला 20 धावांच्या मोबदल्यात 4 झटके दिले. लॉरा 31, अँनेके बॉश 28, अँनेरी डर्कसेन 2 आणि सिनालो जाफ्ता 4 धावांवर बाद झाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 5 आऊट 78 असा झाला होता.

मात्र त्यानंतर मारीजान काप, क्लो ट्रायॉन, नॅडिन डी क्लार्क आणि मसाबाटा क्लास या चौघींनी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात निर्णायक आणि प्रमुख भूमिका बजावली. कापने 56 धावा केल्या. क्लो ट्रायॉन हीने 62 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ट्रायॉन आऊट झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर हा 44.5 ओव्हरमध्ये 198 असा झाला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 31 बॉलमध्ये 35 रन्सची गरज होती आणि हातात फक्त 3 विकेट्स होत्या.

आठव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी

सामना रंगतदार स्थितीत होता. दोन्ही संघांसाठी 1-1 धाव आणि विकेट महत्त्वाची होती. मात्र नॅडिन डी क्लार्क आणि मसाबाटा क्लास या जोडीने कमाल केली. या दोघींनी फटकेबाजी करत नाबाद 38 धावांच्या भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 3 बॉलआधी विजय मिळवून दिला. क्लार्कने 29 बॉलमध्ये 37 रन्स केल्या. तर क्लासने 10 धावांचं योगदान दिलं. बांगलादेशसाठी नाहिदा अक्टरने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.

बांगलादेशची बॅटिंग

त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 232 रन्स केल्या. बांगलादेशसाठी शामीम अक्टरने 50 धावा केल्या. तर शोमा अक्टरने नाबाद 51 धावा करत टीमला 232 धावापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला झटके दिले होते. त्यामुळे बांगलादेश जिंकेल असं चित्र होतं. मात्र बांगलादेशचे गोलंदाज अखेरच्या क्षणी अपयशी ठरले आणि दक्षिण आफ्रिकेने सलग दुसरा सामना जिंकला.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेने 9 ऑक्टोबरला टीम इंडियावर मात केली होती. विशेष बाब म्हणजे दक्षिण आफ्रिकेने त्या सामन्यातही 3 विकेट्सने विजय मिळवला होता. तसेच नॅडिन डी क्लार्क हीने विनिंग सिक्स मारुन दक्षिण आफ्रिकेला जिंकवलं होतं.