आशियातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठी हाणामारी झाली. गुणरत्न सदावर्ते आणि शिंदे गटाचे नेते अडसूळ यांच्या समर्थकांमध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झाली. शिंदे गटाच्या संचालकांनी सदावर्तेच्या संचालकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले, तर सदावर्तेच्या लोकांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा दावा केला.
एका संचालिकेने तर जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या बैठकीत संचालकांनाच परवानगी असताना बाहेरची मंडळी कशी आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दोन्ही गटांमधील या राड्यात चार ते पाच जण जखमी झाले असून, मुंबईतील नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. सदावर्ते यांच्या पॅनेलची सत्ता आल्यापासून एसटी बँक विविध कारणांवरून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.