असगरअली वोरा जमीन वाद : सेव्हन इलेव्हनचा पुन्हा खुलासा, नरेंद्र मेहता यांचा जमिनीशी संबंध नसल्याचा दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 17, 2026

असगरअली वोरा जमीन वाद : सेव्हन इलेव्हनचा पुन्हा खुलासा, नरेंद्र मेहता यांचा जमिनीशी संबंध नसल्याचा दावा

असगरअली वोरा जमीन वाद : सेव्हन इलेव्हनचा पुन्हा खुलासा, नरेंद्र मेहता यांचा जमिनीशी संबंध नसल्याचा दावा

असगरअली वोरा यांच्या जमीन वादावर सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनी खुलासा केला आहे. भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांचा या जमिनीशी कुठलाही संबंध नसल्याचे कंपनीचे डायरेक्टर प्रशांत केळुस्कर यांनी व्हिडीओ प्रसारित करत म्हटले आहे. नरेंद्र मेहता हे केवळ शेअरहोल्डर आहे. त्यांचा कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचा दावा डायरेक्टर प्रशांत केळुस्कर यांनी केला आहे.

कंपनीचे डायरेक्टर प्रशांत केळुस्कर पुढे म्हणतात की कंपनीने असगरअली वोरा यांच्याकडून जमीन खरेदी केलेली नाही. मरविन जोजफ फर्नाडीस आणि मुकेश पारेख यांच्याकडून कंपनीने जमीन खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. जमीन व्यवहाराशी नरेंद्र मेहता यांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच सेव्हन इलेव्हन आणि नरेंद्र मेहता यांच्यातही कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीचे संचालक प्रशांत केळुस्कर यांनी केले आहे. वादग्रस्त जमिनीशी संबंधित सर्व व्यवहार रद्द केल्याचे कंपनीने म्हटले आहे. बांधकाम परवानगी रद्द करण्यासाठी MBMC नगररचना विभागाला पत्र पाठवले असून असगरअली वोरा यांच्यासोबत बैठक घेऊन वाद मिटवल्याचा दावाही कंपनीचे संचालकांनी केला आहे.

असगर अली वोरा यांचा आरोप काय ?

असगर अली वोरा यांनी ८ सप्टेंबर रोजी संबंधित भाजप आमदाराची तक्रार घेऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती.असगर अली वोरा हे मोदी यांचे वर्ग मित्र आहेत. वोरा यांनी दावा केला होता की, त्यांनी १९८९ मध्ये भाईंदर पूर्व येथील नवघर परिसरात सुमारे २,८१० चौरस मीटर जमीन खरेदी केली होती. त्यांचा आरोप आहे की, २०११ मध्ये स्वयं बिल्डर्स आणि नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स या कंपनीने त्या जमिनीवर अतिक्रमण केले. ते या जमिनीसंदर्भात जवळपास १५ वर्षांपासून विविध सरकारी यंत्रणांकडे हेलपाटे घालत आहेत.