
नवी मुंबई: हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात पेंटाग्राफमध्ये बिघाड होऊन त्यातून धूर आल्यामुळं या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशिरानं धावत आहेत. या घटनेत कुणीही जखमी झालं नाही. मात्र, ऐन कार्यालयीन वेळेतच हा प्रकार घडल्यानं चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला. वाशी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील एका गाडीच्या पेंटाग्राफमध्ये हा बिघाड झाला. पेंटाग्राफला आग लागून सगळीकडं धूर पसरला. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीनं तात्काळ हालचाल करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर ही गाडी कारशेडला रवाना करण्यात आली. मात्र, तोपर्यंत हार्बर मार्गावरील अनेक गाड्या रखडल्या होत्या. आता वाहतूक सुरू झाली असली तरी ती पूर्ववत व्हायला काही वेळ लागणार आहे.