
अहमदनगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोपरगावमधील प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर तोफ डागली. शरद पवारांना प्रत्येक नागपूरकर गुंड वाटू लागला आहे. त्यांना जळी-स्थळी नागपूरचे गुंड दिसायला लागले आहेत. एका सामान्य नागपुरकरानं त्यांची ही अवस्था करून ठेवलीय, अशा शब्दांत त्यांनी पवारांवर टीका केली. कोपरगाव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी कलम ३७० आणि पाकिस्तानचा मुद्द्यावर बोलणं टाळून गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. त्यांनी शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. तसंच महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगावमधील बंडखोरीवर सूचक वक्तव्य केलं. आमदार स्नेहलता कोल्हे माझ्या भाची आहेत. त्यामुळे मामा म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहणे हे माझे कर्तव्यच आहे, असे ते म्हणाले. फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे: >> विधानसभा निवडणुका दहा-बारा दिवसांवर आल्या आहेत. पण समोर कोण आहे हेच कळत नाही. >> काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे निवडणूक सोडून बँकॉकला फिरायला गेले. या निवडणुकीत महायुतीचा विजय होईल हे त्यांना ठाऊक आहे. >> शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची अवस्थाही वाईट झालीय. >> 'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ' अशी शरद पवारांची अवस्था झालीय. >> त्यांच्या पक्षात राहायला कुणीच तयार नाही. >> एका सामान्य नागपुरकरानं पवारांची अवस्था काय करून ठेवलीय बघा... >> पवारांना जळी-स्थळी नागपूरचे गुंड दिसू लागले आहेत. त्यांच्या पक्षावर आणि नेतृत्वावर कुणाचाच विश्वास राहिला नाही. >> राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणं ही निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळतात एवढ्यापुरतीच आहे. लोकांमध्ये एवढीच उत्कंठा आहे. >> काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोठा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यांनी आधीच पराभव मान्य केला आहे. >> पुढील पंधरा-वीस वर्षे देशात आणि महाराष्ट्रात निवडून येण्याची संधी नाही हे त्यांनाही ठाऊक आहे. >> घोषणापत्रात वाटेल तशी आश्वासने दिली जात आहेत. पूर्ण न होणारी आश्वासने देत आहेत. पंधरा वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती. त्या काळात त्यांनी काय दिवे लावले हे सांगावे? >> त्यांनी पंधरा वर्षांचा हिशेब मांडावा, आम्ही पाच वर्षांचा हिशेब मांडतो. तो दुप्पट निघाला नाही तर पुन्हा मते मागायला येणार नाही. >> आम्ही २४ तास कामे केली. जनतेसाठी विकासकामे केली. ५० वर्षांच्या यांच्या राजवटीत जे प्रश्न सुटले नाहीत, ते आम्ही पाच वर्षांत मार्गी लावले. >> अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी आमचं सरकार उभं राहिलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. >> शेवटच्या शेतकऱ्याला जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत आमची योजना सुरू राहील. >> राज्यातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही. प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आम्ही पाहिलं आहे. >> समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार. त्यामुळे दुष्काळमुक्ती होऊन पाण्यासाठीचे वादही कमी होतील. >> दुष्काळमुक्त महाराष्ट्र आणि प्रत्येकाच्या हाताला काम देण्यारा महाराष्ट्र घडवायचा आहे. >> काही लोक स्वार्थासाठी विरोध करतात. त्यांना घरी बसवा. त्यांना त्यांची जागा दाखवा.