नवी दिल्लीः महाराष्ट्रातील सत्तापेचावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून हा पेच अद्याप न सुटल्याने सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. उद्या सकाळी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सर्व पक्षकारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केली आहे. यात , मुख्यमंत्री , राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा समावेश आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षाचं सरकार अस्तित्वात येणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं असताना शनिवारी सकाळी भाजपने 'गुपचूप' राज्यपालांच्या उपस्थितीत शपथविधी उरकला. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात राज्यपालांनी या दोन्ही नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. राष्ट्रवादीतील जवळपास सर्वच्या सर्व आमदार शरद पवार यांच्याकडे असल्याने अजित पवारांनी कोणत्या आमदारांच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तसेच देवेंद्र फडणवीस यांना बहुमताचा आकडा पार करण्यासाठी लागणारे १४५ आमदारांचे संख्याबळ कुठे आहे?, असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत.