मुंबई: बंडखोरी करत भारतीय जनता पक्षाला साथ देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार शपथ घेत राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या सर्वात जवळचे समजले जाणारे अजित पवार अशा प्रकारचे पाऊल उचलतील असे खुद्द पवार यांना वाटत नव्हते. मात्र, या काका-पुतण्यामध्ये दीर्घ काळापासून मतभेद सुरू झाले होते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मात्र, असे असले तरी काही तत्कालिक कारणांमुळेच अजित पवार यांना हे पाऊल उचलावे लागले असेही राजकीय विश्लेषक मानत आहेत. सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) प्रकरणे अजित पवार यांच्या विरोधात ईडीची अनेक प्रकरणं सुरू आहेत. जर आपण भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेलो, तर मागे लागलेली ही सगळी प्रकरणे संपुष्टात येतील असे अजित पवार यांना वाटत आहे. हा विचार करून अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असे बोलले जात आहे. वारश्याची लढाई अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपले स्थान भक्कम करण्यात अजित पवार यांचा प्रयत्न आहे. जर आपण भारतीय जनता पक्षासोबत गेलो, तर शरद पवार यांचा उत्तराधिकारी म्हणून पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या पुढे जाऊ शकू, असे अजित पवार यांना वाटत असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटतेय. उपमुख्यमंत्रिपद हे देखील एक कारण? शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याच्या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी शेवटपर्यंत अजित पवार यांची निवड उपमुख्यमंत्रिपदासाठी केली गेली नव्हती. ही गोष्ट अजित पवार यांना रुचली नव्हती. अजित पवार यांच्या ऐवजी राष्ट्रवादीच्या एका नेत्याचे नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होते अशीही अफवा पसरली होती. हे देखील अजित पवार यांच्या बंडखोरीमागचे एक कारण असावे असे राजकीय विश्लेषकांना वाटते. पुत्र पार्थच्या पराभवाची सल लोकसभा निवडणुकीत पुत्र पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हवे तसे सहकार्य केले नव्हते आणि म्हणूनच पार्थ पवार यांचा पराभव झाला असे मानत अजित पवार नाराज झाले होते. या व्यतिरिक्त, पार्थ पवार यांना मागे सारत शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना पुढे आणले जात आहे, या दृष्टीनेही पाहिले गेल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. कायद्याच्या लढाईत पडले एकटे ईडीने जेव्हा शरद पवार यांच्या विरोधात पावले उचलायला सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण पक्ष शरद पवार यांच्याबाजूने उभा राहिला, मात्र हीच आपली स्थिती झालेली असताना कायदेशीर लढाई लढण्यासाठी आपण एकटेच होतो, असे अजित पवार यांना वाटत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. यामुळे देखील अजित पवार नाराज होते, असे म्हटले जात आहे. शिवसेनेशी संबंध चांगले नाहीत अजित पवार यांचे संबंध सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाशी चांगले आहेत. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला सहकार्य देण्यात अजित पवार यांना अडचण वाटत होती. सन २००८ मध्ये छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री बनवण्यावरूनही अजित पवार नाराज होते. त्याच प्रमाणे सन २०१० मध्ये अशोक चव्हाण यांनी त्यांचे नाव आदर्श घोटाळ्यात आल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आमदारांची संख्या अधिक असल्याने मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हावा असे अजित पवार यांना वाटत होते. मात्र, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री बनले आणि त्यावेळी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले होते.