
मुंबई: महाराष्ट्रातल्या सरकार स्थापनेच्या दृष्टीने आज पहाटेपासून अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. या सगळ्या नाट्याची सूत्रे दिल्लीत हलली होती का? या सगळ्याची कल्पना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना होती का याबाबत आता उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. असंही म्हटलं जात आहे की खासदार यांनाही भाजपने दिल्लीत मंत्रीपदाची ऑफर दिल्याचे म्हटले जात आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित नव्हते. त्यामुळे अजित पवारांनी जे पाऊल उचललं आहे त्याला पवार तसेच अन्य नेत्यांचा पाठिंबा आहे का याबाबत साशंकता आहे. तरीही सुप्रिया सुळेंना अशी ऑफर दिली गेली असल्याचीही जोरदार चर्चा आहे. सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या आहेत. त्यांना एखाद्या चांगल्या खात्याच्या मंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चेला आता उधाण आले आहे. दरम्यान, सत्तास्थापनेसंदर्भात अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.