मुंबई- टीव्हीचा नावाजलेला चेहरा कुशल पंजाबीचं वयाच्या ३७ व्या वर्षी निधन झालं. टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कुशलने आत्महत्या केली. ही बातमी कुशलचे जवळचे मित्र करणवीर बोहरा आणि चेतन हंसराज यांनी खरी असल्याचं सांगितलं. काल राहत्या घरी कुशलचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. आज दुपारी १ वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. करणवीर बोहराने शेअर केली बातमी- कुशलच्या आत्महत्येची बातमी करणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली. कुशल आणि करणवीर फार चांगले मित्र होते. करणवीरने कुशलचा फोटो शेअर करत एक भावनिक मेसेज लिहिला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुझ्या निधनाच्या बातमीमुळे मी पुरता हललो आहे. माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास नाहीये. मला माहितीये तू जिथे कुठे असशील तिथे आनंदी राहशील. ज्या पद्धतीने तू तुझं आयुष्य जगलास तू मला नेहमीच प्रेरणा दिलीस.. पण मला काय माहीत होतं...' 'डान्सिंग, फिटनेस, ऑफ- रोड बायकिंग, फादरहुड आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचं तुझा हसता चेहरा.. सतत आनंदी राहणं.. मी तुला खूप मिस करेन. आयुष्य मुक्तपणे जगणारा म्हणून तू कायम लक्षात राहशील.' कुशल पंजाबीने 'इश्क में मरजावां' मालिकेत शेवटचं काम केलं होतं. कुशलच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने एका यूरोपियन मुलीशी लग्न केलं होतं. २०१६ मध्ये त्याला एक मुलगा झाला. कुशलने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. त्याने अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.