ठाणे: मध्य रेल्वेची कसारा-कल्याण दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. खडवली-टिटवाळा स्थानका दरम्यान रुळाला तडे गेल्याने लोकल वाहतूक रखडली आहे. लोकल गाड्यांचा खोळंबा झाला असून प्रवाशांना ऐन सकाळीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सकाळी ८.४५ वाजण्यास रेल्वे रुळाला तडे गेले. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली. मध्य रेल्वेच्या वासिंद, खडवली, आसनगाव स्थानकादरम्यान लोकल गाड्या उभ्या आहेत. कसाऱ्याहून मुंबई सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक पुढील सूचना येईपर्यंत थांबवण्यात आली आहे. प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. काही वेळेतच हे काम पूर्ण होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, ऐन सकाळीच मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे सकाळी ऑफिस, कॉलेज गाठणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.