श्रीनगर: पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये दबा धरून बसलेल्या दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे. आज सकाळी सकाळीच सुरक्षा दलाने या अतिरेक्यांचा एन्काउंटर केला. त्यानंतर पुन्हा एकदा त्राल परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. पोलिसांना त्रालमध्ये दोन ते तीन लपून बसल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी आज सकाळी दक्षिण काश्मीर जिल्ह्याच्या त्रालमधील गुलशनपोरा परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. सुरक्षा दलाचं हे सर्च ऑपरेशन सुरू असतानाच अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार केला. त्यामुळे सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्युत्तरात दोन अतिरेकी ठार झाले. अद्यापही गुलशनपोरामध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांदरम्यान चकमक सुरू असून दुसऱ्या बाजूला सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशनही सुरूच ठेवले आहे.
दरम्यान, शनिवारीच पोलिसांनी कुलगाम येथून दोन अतिरेक्यांना अटक केली होती. पकडलेल्या अतिरेक्यांपैकी नावेद हा हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा टॉप कमांडर आहे. त्याच्यावर शोपियांमधील एका ट्रक चालकाच्या हत्येचा गुन्हा दाखल आहे. तर त्याच्यासोबत पकडण्यात आलेला त्याचा साथीदार नुकताच हिजबुलमध्ये दाखल झाला होता. दोघंही शोपियांचे रहिवासी आहेत. विशेष म्हणजे एका पोलीस उपअधिक्षकासोबत कारने जात असताना या दोघांना सुरक्षा दलाने अटक केली असून पोलीस उपअधिक्षकालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.