कोरोना विषाणू: २५ भारतीय वुहानमध्ये अडकले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 24, 2020

कोरोना विषाणू: २५ भारतीय वुहानमध्ये अडकले

https://ift.tt/2TRuB6t
बीजिंग: चीनमध्ये कोरोना या जीवघेण्या विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वुहानसह हुआंगगंग शहरांचा संपर्क इतरांपासून तोडण्यात आला आहे. या वुहानमध्ये २५ भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. २५ पैकी २० विद्यार्थी हे केरळमधील आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळं भारताच्या चिंतेत भर पडली आहे. कारण वुहान आणि आसपासच्या शहरांमध्ये ७०० भारतीय विद्यार्थी वास्तव्यास आहेत. बहुतांश विद्यार्थी हे चीनच्या विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळं आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८३० जणांना बाधा झाली आहे. मुंबईतील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या ६० तासांत वुहानसह चीनमधील अन्य भागांतून परतलेल्या पाच भारतीयांची कसून तपासणी केली जात आहे. त्यातील दोघांना सर्दी आणि खोकला झाला आहे. त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यात विषाणूची कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूसंदर्भात भारतही चिंतेत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती देण्यात आली. चीनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी भारताने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. तेथून येणाऱ्या लोकांना एका स्क्रीनिंग प्रक्रियेतून जावे लागणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. चीनमधील भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. केरळमध्ये विमानतळावर कसून तपासणी होत आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता येथील विमानतळांवर तपासणीसाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. चीनच्या वुहान शहरात विषाणूचा प्रादूर्भाव वाढला आहे. आता हा विषाणू सिंगापूर आणि व्हिएतनामपर्यंत पसरला आहे. चीनमध्ये कोरोना या जीवघेण्या विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वुहानसह हुआंगगॅँग शहरांचा संपर्क इतरांपासून तोडण्यात आला आहे. या दोन शहरांना जोडणाऱ्या रस्ते, रेल्वे आणि विमानसेवा तातडीने बंद करण्यात आल्या आहेत. प्राण्यांतून माणसांत आला विषाणू चीनमधील कोरोना विषाणू प्राण्यांतून माणसांत आल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. त्यामुळे उपचारांत मदत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्यांना या विषाणूंची लागण झाली होती ते समुद्री प्राण्यांच्या संपर्कात आले होते. त्यात साप, वटवाघळे, कुक्कुटवर्गीय प्राणी आणि अन्य पाळीव प्राण्यांचाही समावेश होता. चीनमधील पेकिंग युनिर्व्हर्सिटीतील आरोग्य विज्ञान केंद्राने हे संशोधन केले आहे. 'जर्नल ऑफ मेडिकल व्हायरॉलॉजी'मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. वुहानमध्ये डिसेंबर २०१९मध्ये झालेल्या न्यूमोनियानंतर लागण वाढत गेल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.