दिल्लीत 'आपमतलब्यां'चा पराभव झाला; शिवसेनेची टीका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 12, 2020

दिल्लीत 'आपमतलब्यां'चा पराभव झाला; शिवसेनेची टीका

https://ift.tt/2vraDFk
मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून शिवसेनेने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. केजरीवाल यांनी केलेल्या कामांच्या जोरावर पुन्हा सत्ता मिळवली हे मान्य केले पाहिजे. त्यांनी लोकांना गंडवले नाही व जे केले त्यावरच मते मागितली, असं सांगतानाच हिंदू-मुसलमान, पाकिस्तान वगैरे बोंबलत बसले. 'केजरीवाल हे एक नंबरचे आतंकवादी आहेत' असे भाजपने जाहीर केले. पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या 'आप'चा झाला. 'आपमतलब्यां'चा पराभव झाला. केजरीवाल यांच्या झाडूने सगळ्यांना साफ केले, असा जोरदार टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मधून शिवसेनेने भाजपवर ही टीका केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'चा विजय झाला यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षाही दिल्लीची निवडणूक गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिष्ठेची केली होती. जयप्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, पण दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे सूत्रधार अमित शहा हेच होते. पक्षाचे अध्यक्षपद सोडताना त्यांना एक विजय मिळवायचा होता. ते शक्य झाले नाही. झारखंडमध्ये पराभव झाला व ध्यानीमनी नसताना महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातचे गेले. देशाच्या राजधानीवर 'आप'चा झेंडा फडकला, तर आर्थिक राजधानीवर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्य करीत आहे. हा बाण काळजात आरपार खुपणारा आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. 'हम करे सो कायदा' वृत्तीचा पराभव चार महिन्यांपूर्वी दिल्लीतील सातपैकी सात लोकसभा जागांवर भाजपचा विजय झाला तो पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा होता. मोदी किंवा भाजपसमोर एखाद्या पक्षाचे किंवा नेत्याचे तगडे आव्हान नव्हते. त्यामुळे भाजपचा एकतर्फी विजय झाला, पण विधानसभा निवडणुकीत एकीकडे राज्यांतील तगडे नेतृत्व आणि त्यांच्यासमोर मोदी आणि शहांची 'हवाबाज' नीती फोल असे चित्र निर्माण झाले आहे, असं सांगतानाच दिल्ली विधानसभेचा निकाल पाहिला तर एकटे केजरीवाल हे संपूर्ण केंद्र सरकार व शक्तिमान भाजपला भारी पडले आहेत. केजरीवाल यांच्या पराभवासाठी भाजपने देशभरातील अडीचशे खासदार, दोन-चारशे आमदार, मुख्यमंत्री तसेच राज्यांचे मंत्री व संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ मैदानात उतरवले होते, पण त्या सर्व फौजांचे शेवटी दिल्लीच्या मैदानावर साफ पानिपत झाले. अहंकार, मस्तवालपणा आणि 'हम करे सो कायदा' या वृत्तीचा हा पराभव आहे, असा घणघातही शिवसेनेने केला आहे. शिवसेनेची टोलेबाजी >> केजरीवाल यांचा दिल्ली प्रदेश हा केंद्रशासित असल्याने कायदा सुव्यवस्था, पोलीस, उद्योग हे विषय त्यांच्या अखत्यारीत येत नाहीत. त्याचा त्यांना फायदाच झाला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ बारा वाजले व त्याचे खापर मोदी-शहांवर फोडण्यात ते यशस्वी झाले. >> दिल्लीच्या विधानसभेत कोणत्या प्रश्नांवर निवडणुका लढवाव्यात यावर भाजपात नेहमीप्रमाणे गोंधळ उडाला. नेहमीप्रमाणे येथेही हिंदू-मुसलमान, राष्ट्रवाद आणि देशद्रोह याच विषयांवर भारतीय जनता पक्षाने प्रचार केला व मते मागितली, पण दिल्लीतील सर्वच थरांतील मतदारांनी हे सर्व विषय ठोकरून लावले व केजरीवाल यांनी पाच वर्षांत जे काम केले त्यावरच मतदान केले. >> नागरिकता सुधारणा कायदा, एनआरसी या मुद्दय़ांवर वातावरण तापवले. सीएए म्हणजे नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात आंदोलक बसले व हे फक्त मुसलमानांचे आंदोलन आहे असा प्रचार करून मते मिळवण्याचा प्रयत्न झाला. तो फारसा यशस्वी झाला नाही. >> विधानसभेच्या ७० पैकी तब्बल ६०च्या वर जागा आपने जिंकल्या. गेल्या वेळेपेक्षा यावेळी भाजपच्या जागा वाढल्या. मतांची टक्केवारीही थोडी वाढली आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात घसरून त्यांना पुन्हा भोपळाही फोडता आला नाही, हे भाजपसाठी कदाचित ‘दिलासादायक’ असू शकते, परंतु शेवटी केजरीवाल आणि त्यांनी पाच वर्षांत केलेली कामे कथित राष्ट्रवाद, हिंदू-मुसलमान ध्रुवीकरण यांच्या जुमलेबाजीपेक्षा सरस ठरली.