
अहमदाबाद: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष २४ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे नेते ट्रम्प हे आपल्या दौऱ्यादरम्यान गुजरातमधील अहमदाबाद शहराला भेट देणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सजणाऱ्या अहमदाबादेत 'केम छो ट्रम्प' (कसे आहात ट्रम्प) या घोषणेचा वापर केला जात आहे. मात्र, आता ही घोषणा फक्त गुजरातपुरतीच मर्यादित राहू नये आणि ती देशव्यापी बनावी यासाठी तीत बदल करून ती 'नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प' अशी केली आहे. या माध्यमातून गुजरात सरकारचा या दौऱ्याला राष्ट्रीय आयाम प्राप्त व्हावा हा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाचा ध्वनी संपूर्ण देशभर ऐकू आला पाहिजे, या मुळेच गुजरात सरकारने 'केम छो ट्रम्प'चे रुपांतर 'नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प'मध्ये केले आहे, असे गुजरातचे मुख्य सचिव अनिल मुकीन यांनी माहिती देताना सांगितले. नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प या संकल्पनेच्या आधारावरच देशभरात प्रचार करावा आणि त्याबाबतच्या केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करावे असे केंद्र सरकारने गुजरात सरकारला सांगितले असल्याचेही मुकीन यांनी म्हटले आहे. राज्यासाठी नव्हे, संपूर्ण देशाचा कार्यक्रम बनवण्याचा प्रयत्न 'केम छो ट्रम्प' ऐकताना ते फक्त एका राज्याच्या (गुजरात) कार्यक्रमासारखे वाटते, अशी चर्चा देशभरात रंगू लागली आहे. सर्व प्रसिद्धी साहित्य आणि इतर माध्यमांना भारतीय परंपरेच्या 'नमस्ते' शी जोडले जावे असे स्पष्ट निर्देशच केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची ही पहिलीच भारत भेट आहे. प्रथम डोनाल्ड ट्रम्प दिल्लीला भेट देतील. त्यानंतर ते विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी अहमदाबादला जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही त्यांच्याबरोबर मोटेरा स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पहिल्या दौर्यावर 'गुजराती' असा शिक्का बसणे योग्य ठरणार नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे लक्षात घेऊनच आता मोहीम आणि घोषणेत तसा बदल केला जात आहेत. पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी बाकी या संपूर्ण कार्यक्रमाची थीम 'इंडिया' हीच असेल, असे गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी सांगितले. मात्र, अद्याप पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून 'नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प' या थीमला मंजुरी मिळणे बाकी आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर सर्व बोर्ड्स आणि होर्डिंग्जवर ही थीम दिसू लागेल. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या थीमच्या आधारे सर्व पोस्टर्सवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मिलानिया यांची छायाचित्रे असणार आहेत.