
> श्रीकांत शिनगारे दहावी व बारावी सुरू होत आहेत. आणि परीक्षा म्हटलं की थोडी भीती वाटणे व ताण येणे स्वाभाविक आहे. परंतु वेळेचे व्यवस्थापन,नियोजनबद्ध अभ्यास व तब्येतीची काळजी घेऊन आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, यश निश्चित मिळेल. १. तुम्ही वर्षभर अभ्यास केला आहे, अनेक कृतीपत्रिका सोडविण्याचा सराव देखील केला आहे. लक्षात ठेवा जेवढे कष्ट घेतले तेवढे यश निश्चित मिळणार हे नक्की. २. परीक्षेच्या आधी त्या त्या विषयाची किमान एक वेळा उजळणी होणे आवश्यक आहे ती जरूर करा. ३. गेल्या काही वर्षांपासून बोर्ड तुमच्यासाठी भय आणि तणावमुक्त परीक्षा अभियान राबवित आहे. प्रत्येक पेपरच्या आधी किमान एक दिवसाची सुट्टी दिली आहे. वेळ वाया न घालवता अभ्यास केल्यास संपूर्ण अभ्यासाची उजळणी करता येते. ४. केवळ रेडिमेड नोट्स न वाचता तुमच्या क्रमिक पुस्तकांचा सखोल अभ्यास करणे कृतिपत्रिका सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल. ५. परीक्षा केंद्र ते घर यामधील अंतर व लागणारा वेळ याचा अंदाज घ्या. त्यानुसारपरीक्षेसाठी घरातून बाहेर पडा. पहिल्या पेपर ला परीक्षेच्या वेळेच्या एक तास अगोदर व त्यानंतर अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहचा. सोबत हॉलतिकीट व लेखन साहित्य घ्यायला विसरू नका. ६. आपात्प्रसंगी वेळेत तुमच्या परीक्षा केंद्रावर पोहचणे शक्य होत नसेल तर तुमच्या जवळच्या परीक्षा केंद्रावर पोहचा. तिथे तुम्हाला परीक्षेला बसू दिले जाईल परंतु लक्षात घ्या योग्य कारण असावे लागेल. ७. मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स परीक्षा कक्षात नेऊ नका त्यास मनाई आहे. ८. हॉलतिकीट हरवल्यास घाबरु नका. तुमच्या शाळा/कॉलेज शी संपर्क साधा. तुम्हाला दुसरे हॉलतिकीट मिळेल. ९. परीक्षा कक्षात कृतीपत्रिका हातात पडल्यानंतर काहीजणांच्या बाबतीतअचानक ब्लँक होणे (काहीच न आठवणे), घाम येणे, छातीत धडधडणे अशी लक्षणे दिसल्यास घाबरु नका. थोडावेळ डोळे मिटून शांत बसा, आपल्या श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या. दीर्घ श्वास घ्या व सोडा. वर्षभर तुम्ही अभ्यास केला आहे काहीतरी आठवेलच असा विश्वास निर्माण करा व लिहायला सुरुवात करा. हळूहळू सर्व आठवायला लागेल. १०. परीक्षा झाल्यानंतर झालेल्या विषयावर किती बरोबर व किती चूक यावर चर्चा करू नका. ११. काही विषयाचे दोन भाग व दोन स्वतंत्र पेपर होतात. एखादा भाग अवघड गेला तर दुसऱ्या भागाची चांगली तयारी करा. १२. परीक्षेचा ताण जाणवत असेल तर घरातील लोकांशी मनमोकळेपणाने बोला ते तुम्हाला समजून घेतील. बोर्डाने विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. समुपदेशक तुम्हाला ताण हलका करण्यास मदत करतील. १३. परीक्षासंबंधी (परीक्षेच्या वेळेत बदल, परीक्षा रद्द इ.)व्हॉट्सऍप वा सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका वा अफवा पसरवू नका. खात्रीसाठी आपल्या शाळा अथवा बोर्डाशी संपर्क साधा. १४. परीक्षेच्या काळात तब्येत चांगली राहील याची काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा, फळे खा, हलके अन्न घ्या,भरपूर पाणी घ्या. जागरण टाळा. रिकाम्यापोटी परीक्षेला जाणे वा अभ्यास करणे टाळा. लक्षात ठेवा, ही परीक्षा महत्वाची असली तरी अंतिम नाही. तुम्ही केलेल्या प्रयत्ना इतके यश तुम्हाला मिळेलच. आणि मिळणाऱ्या यशावर काहींना काही करिअरच्या वाटा उपलब्ध आहेत. तेव्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. (लेखक महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे समुपदेशक आहेत.)