नगर: मृतदेह बसथांब्यावर टाकून एसटी चालक पसार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 16, 2020

नगर: मृतदेह बसथांब्यावर टाकून एसटी चालक पसार

https://ift.tt/2HudG2A
संगमनेर: श्रीरामपूर बस आगारात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. आश्वी बुद्रुक थांब्यावर बसचालक-वाहकाने बसमधील मृतदेह प्रवाशांच्या मदतीने खाली उतरवला आणि पोलिसांना त्याची माहिती न देताच तिथून पळ काढला. त्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे. श्रीरामपूर आगाराची श्रीरामपूर-आश्वी ही बस शनिवारी सकाळी ११ सुमारास आश्वी बुद्रुक येथे आली. सारे प्रवासी उतरून गेले. परत जाण्यासाठी बस वळली, त्या वेळी वाहकाला बसमध्ये एक वृद्ध प्रवासी निश्‍चल अवस्थेत आढळला. त्याने गावातील काही युवकांच्या मदतीने, 'बाबा दारू प्यायलेली आहे,' असे सांगत, हात-पाय धरून खाली टाकून बस वेगाने परतीच्यामार्गाने दामटली. काही वेळानंतर त्या व्यक्तीची हालचाल न दिसल्याने, त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. 'तो मेलाय, हे त्या वाहकाला माहीत असणार, म्हणूनच त्याने बस दामटली', 'माणुसकीच मेली हो' अशा संतप्त प्रतिक्रिया परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली. लक्ष्मण बाबूराव जाधव (वय ६०, मूळ रा. दरेवाडी, ता. नगर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. दरम्यान, कोतवाल सोमनाथ गाडेकर यांनी पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात पाठवला. तपासाअंती त्या मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण बाबूराव जाधव (वय ६०, मूळ रा. दरेवाडी, ता. नगर) असे असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मागे कोणी नसल्याने ते दाढ बुद्रुक (ता. राहाता) येथील नातलगांकडे अधूनमधून राहत असल्याचे आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असल्याचे समजले. शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे कारण व वेळ समजणार आहे. मात्र, खोटे कारण सांगून, पोलिसांना माहिती न देता, गजबजलेल्या बसथांबा परिसरात, मृतदेह एसटीबाहेर काढून साळसूदपणे निघून गेलेल्या चालक-वाहकाच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कृत्याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली. दरम्यान, आश्‍वी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.