नागपूर: आता फक्त घरपोच मद्य मिळणार, पण... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 16, 2020

नागपूर: आता फक्त घरपोच मद्य मिळणार, पण...

https://ift.tt/3fTgl5D
नागपूर: लॉकडाऊनच्या काळात कंटेन्मेंट झोन वगळता मद्यालयातच नाही तर घरपोचही मद्य मिळणार असल्याच्या आदेशात एका दिवसातच बदल करण्यात आला आहे. आता पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागातच ऑनलाइन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. तसा सुधारित आदेश काढण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मद्यनिर्मिती, मद्यविक्रीला काही अटी-शर्तींवर परवानगी देण्यात आली होती. याबाबत आदेशही काढण्यात आला होता. शुक्रवारपासून मद्यविक्रीस सुरुवात होणार होती. मद्यालयातच नाही तर घरपोच मद्य मिळणार असल्याचे आदेशात म्हटले होते. कंटेन्मेंट झोनमध्ये मद्यविक्री पूर्णपणे बंद राहील, असं त्या आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र, या आदेशात एका दिवसातच बदल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या नागपूर महापालिका क्षेत्राबाहेरील एफएल-२, एफएलबीआर-२, किरकोळ विक्रीची दुकाने बंद करण्यात आली आहेत. सीएल-३ दुकाने (सीलबंद विक्री) खुली ठेवण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे सुधारित आदेशात म्हटले आहे. परवानाधारक विक्रेत्यांना घरपोच मद्य ( होम डिलिव्हरी ) देण्यास (कंटेन्मेंट झोन वगळून) परवानगी देण्यात आली आहे. मात्र, देशी दारू घरपोच दिली जाणार नाही. इतर सर्व आणि अटी व नियम कायम राहतील, असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. घरपोच मद्य सेवेबाबत देण्यात आलेल्या आदेशाचा भंग झाल्यास संबंधित परवानाधारक आणि दोषींविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ च्या कलम ५१, ६० अन्वये, साथरोग कायदा १८९७, भादवि कलम १८८ अन्वये, तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.