
वॉशिंग्टन: करोना साथीच्या पार्श्वभूमीवर विमानातील मधील आसन रिकामी ठेवण्याचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. अमेरिकेच्या 'साथ नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रा'ने (सीडीसी) त्याबाबत स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे. विमानप्रवासात बहुतांश विषाणू किंवा जंतू सहजासहजी फैलावत नाहीत. त्यामुळे दोन प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी मधले आसन रिकामी ठेवण्याची शिफारस आपण करत नाही, असे या केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. विमानांतील हवेच्या अभिसरण आणि शुद्धिकरण यंत्रणेमुळे बहुतांश विषाणू आणि जंतू पसरत नाहीत. मात्र, करोना साथीच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासी सुरक्षित आहेत, असे म्हणता येणार नाही. या विषाणूची लागण होऊ नये यासाठी काळजी ही घेतलीच पाहिजे. त्यामुळे शक्यतो अमेरिकन जनतेने विमानप्रवास टाळावाच, असे 'सीडीसी'च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. वाचा: करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतील विमानप्रवास जवळपास ९० टक्के बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर 'सीडीसी'ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, विदेशांतून अमेरिकेत येणाऱ्या सर्व विमान प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाइन करण्याची मुख्य सूचना त्यात आहे. विमान प्रवासाच्या सुरुवातीला विमातळावर प्रवाशांचा बराच वेळ जातो. रांगांमध्ये उभे रहावे लागते. त्या वेळी इतर व्यक्ती, वस्तूंशी संपर्क येऊ शकतो. तेथेच सर्वात जास्त काळजी घेण्याची गरज आहे, अशीही सूचना 'सीडीसी'ने केली आहे. वाचा: विमान प्रवाशांशी सातत्याने संपर्कात असणाऱ्या कर्मचारी वर्गानेही आत्यंतिक काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. ताप, खोकला, श्वास घेण्यात अडचणी अशी लक्षणे दिसणाऱ्या प्रवाशांविषयी कर्मचारी वर्गाने तातडीने संबंधित यंत्रणांना कळवावे, असे 'सीडीसी'ने सांगितले आहे. आणखी वाचा: