मुंबई: 'महाराष्ट्राचे राज्यपाल हे एक सरळमार्गी, नाकासमोर चालणारे विचारी सद्गृहस्थ आहेत. संघ विचाराचा झेंडा खांद्यावर घेऊन आयुष्य वेचणारे ते एक संतमहात्मा आहेत. राजभवनात बसून राजकीय काड्या घालण्याचे उद्योग ते करणार नाहीत,' असं म्हणत शिवसेनेनं राज्यातील भाजप नेत्यांना जोरदार टोला हाणला आहे. () वाचा: मागील दोन दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी घेतलेली राज्यपालांची भेट, त्यानंतर मुख्यमंत्री यांच्याशी केलेली चर्चा व भाजपचे खासदार यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याच्या केलेल्या मागणीमुळं संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून या घडामोडींवर भाष्य करण्यात आलंय. 'महाराष्ट्रातील स्थितीविषयी राज्यपालांशी चर्चा करणे, माहिती घेणे म्हणजे राजभवनाच्या ‘पोटात’ काही खळबळ सुरू आहे असे नाही. राज्यघटनेतील तरतुदीनुसार राज्यकारभार चालला आहे की नाही हे पाहणं हे राज्यपालांचं काम आहे. त्यांनी राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना फार मोठी किंमत चुकवावी लागते असे इतिहासाचे दाखले आहेत. मुळात महाराष्ट्राचे सरकार हे घटनेनुसार काम करीत आहे. सरकारच्या स्थिरतेसंदर्भात कोणत्याही अडचणी दिसत नाहीत. असे असताना राजभवनात काहीतरी वेगळे जंतरमंतर चालले आहे अशा अफवा पसरवणारे राज्यपालांच्या भूमिकेवरच प्रश्न निर्माण करीत आहेत. सरकार बनवणारे व सरकार पाडू इच्छिणारे असे सगळेच जण राजभवनाच्या पाहुणचाराचा आनंद घेत असतात. या आनंदास गेल्या काही दिवसात भरते आल्याचे दिसत असेल तर त्यात राज्यपालांचा काय दोष?,' असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केलाय. 'सरकारविरोधात ठणाणा बोंबा मारणे हे विरोधी पक्षाचे उद्योग आहेत. अशा बोंबा ठोकल्याने सरकारचा बालही बाका होणार नाही. विरोधकांचा दृष्टिकोण महाराष्ट्र हिताचा नाही. विरोधासाठी विरोध हेच धोरण आहे व त्यासाठी राज्यपालांनी विरोधकांना ‘खडेबोल’ सुनवायला हवेत,' अशी अपेक्षाही शिवसेनेनं व्यक्त केली आहे. 'करोनाचे संकट नसते व सर्व काही आलबेल असते तर सरकारने सहा महिने पूर्ण केले या आनंदाप्रीत्यर्थ विरोधी पक्षाला श्रीखंड-पुरीचे जेवण घालता आले असते,' असा टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आलाय.