करोनाची दुसरी लाट ; सोन्याची विक्रमी स्तराकडे वाटचाल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 22, 2020

करोनाची दुसरी लाट ; सोन्याची विक्रमी स्तराकडे वाटचाल

https://ift.tt/2APP1G2
मुंबई : कमाॅडिटी बाजारात सोमवारी सकाळी सोन्याच्या किंमतीत ०.७ टक्क्याची वाढ झाली. सोन्याचा भाव ४८२८९ रुपयांवर गेला. चांदीचा भाव १.२ टक्क्यांनी वाढून ४९१९० रुपये झाला आहे. सोने आणि चांदीतील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवाड्यात कमाॅडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी उलथापालथ दिसून आली होती. शुक्रवारी सोने ६०० रुपयांनी महागले होते. या तेजीने सोन्याचा भाव ४८००० रुपयांवर गेलो आहे. चांदीच्या किंमतीत १.५ टक्क्याची वाढ झाली होती. चांदीचा भाव किलोला ४८५९८ रुपये झाला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने या मौल्यवान धातूंची मागणी आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. करोनाने आतापर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान केले आहे. भांडवली बाजारातील गुंतवणूकदार पोळून निघालेत. त्यामुळे सुरक्षित आणि कमी जोखमीची गुंतवणूक म्हणून गोल्ड ईटीएफ, गोल्ड बाॅंड आदी योजनांना गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जागतिक बाजारात देखील सोन्यातील तेजीने गुंतवणूकदारांचे डोळे पांढरे केले आहेत. चालू वर्षात सोन्याच्या किंमती १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. गोल्डमन सॅक्स या संस्थेने पुढील सहा महिने ते वर्षअखेर सोने १८०० ते २००० डाॅलर प्रती औंसपर्यंत जाईल, असे भाकीत केले आहे. रुपया आणि डाॅलरमधील विनिमय दर कायम राहीला तर भारतीयांसाठी सोन्याचा दर प्रती १० ग्रॅमसाठी ८०००० ते १ लाखांच्या दरम्यान जाईल, असा अंदाज आहे. आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८७० रुपये झाला. २४ कॅरेटचा भाव ४७८७० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४६७८० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४७९७० रुपये आहे. सोन्यातील तेजीचा विचार केला तर मागील सहा महिन्यांत सोन्याच्या किंमतीत २३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षात सोने २५ टक्क्यांनी महागले होते. भारत हा सोने खरेदी करणारा जागतिक बाजारपेठेतील दुसरा मोठा ग्राहक आहे. त्यामुळे भारतासाठी सोने आयात करताना चलन विनिमय दर महत्वाचा असतो. दरम्यान चालू वर्षात रुपयात डाॅलरच्या तुलनेत ७ टक्के अवमूल्यन झाले आहे. शुक्रवारी डाॅलरसमोर रुपया ७६.१९ वर बंद झाला.