जळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते यांना अव्वाच्या सव्वा पाठवून महावितरणने खडसेंना शॉक दिला आहे. महावितरणने एक लाखाचं वीज बिल पाठवल्याने एकनाथ खडसे संतापले असून नागरिकांना येणाऱ्या भरमसाठ वीज बिलावर तोडगा काढण्यासाठी राज्यसरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरमध्ये घर आहे. महावितरणने खडसेंना एप्रिल ते जुलै या महिन्याचं १ लाख ४ हजार रुपये वीज बिल पाठवलं आहे. प्रचंड प्रमाणात बिल आल्याने खडसे चांगलेच भडकले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करून संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. महावितरणने मला प्रचंड बिल पाठवलं आहे. सर्वसामान्य लोकांनाही अव्वाच्या सव्वा बिल पाठवलं आहे. महावितरणने भरमसाठ बिल पाठवून सामान्य नागरिकांना वेठीस धरू नये. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावं आणि सामान्यांना वेठीस धरू नये. राज्य सरकारने याप्रकरणात ग्राहकांना सवलत द्यावी, अशी मागणी खडसे यांनी केली आहे. दरम्यान, करोनानंतरच्या लॉकडाऊनमध्ये सर्व काही ठप्प झाल्याने वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनीही प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन मीटर वाचन बंद केले होते. या काळात मागील तीन महिन्यांच्या बिलाची सरासरी काढून त्यानुसार ग्राहकांना बिल पाठवण्यात आलं होतं. राज्य वीज नियामक आयोगाच्या सूचनेनुसारच कंपन्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे ग्राहकांना एप्रिल व मे महिन्यात आलेले वीज बिल हे जानेवारी, फेब्रुवारी व मार्चच्या बिलाच्या रकमेच्या सरासरीवर आधारीत होते. या तीनही महिन्यात उकाडा तुलनेनं कमी होता. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत शाळा, कॉलेज व कार्यालये सुरू असल्यानं लोक नित्यनेमानं घराबाहेर पडत होते. साहजिकच या तीन महिन्यात विजेचा वापर कमी होता. परिणामी बिलाचा आकडाही कमी होता. एप्रिलपासून उकाडा वाढत गेला. त्यातच लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळं सगळेच लोक घरात होते. साहजिकच एप्रिल व मे महिन्यात विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. ३१ मे नंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वीज कंपन्यांनी पूर्वीप्रमाणे मीटर वाचन सुरू केले. त्यानुसार पाठवलेले बिल हे एप्रिल व मे महिन्यातील प्रत्यक्ष वीज वापरावर आधारीत होते. तो आकडा आधीच्या तुलनेत मोठा होता. त्यामुळे ग्राहकांना आता 'शॉक' बसला आहे. वीज बिलाची आकारणी साधारणपणे चार टप्प्यांमध्ये केली जाते. ०-१००, १०१-३००, ३०१ ते ५०० आणि ५०१ युनिटच्या वर असे हे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यानुसार विजेचा दर वाढत जातो. एप्रिल, मे महिन्यातील बिलात ग्राहकांना याचाही फटका बसला आहे.