
लंडन: करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या ब्रिटनसाठी मंगळवारचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. ब्रिटनमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार असून त्यापूर्वीच तयारी पूर्ण झाली आहे. रशियानंतर ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू होणार असून साऱ्या जगाच्या नजरा ब्रिटनकडे खिळल्या आहेत. ब्रिटन फायजरकडून चार कोटी लस खरेदी करणार असून त्यामुळे किमान दोन कोटीजणांना लस देता येणार आहे. करोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले. मागील आठवड्यात ब्रिटनने फायजरने विकसित केलेल्या लशीला मंजुरी देत सर्वांसाठी लस उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली. सर्व चाचण्या पार पाडल्यानंतर आवश्यक त्या मंजुरी मिळवून लसीकरण मोहीम सुरू करणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे. फायजरने ही करोना प्रतिबंधक लस जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत संयुक्तरीत्या विकसित केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत लस ९५ टक्के प्रभावी आढळली होती. तर, वयस्कर नागरिकांसाठी ही लस फायदेशीर ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. चाचणीत वयस्करांमध्ये ही लस ९४ टक्के यशस्वी झाली होती. ब्रिटनमध्ये ही लस घेणे सक्तीचे नसून ऐच्छिक असणार आहे. ब्रिटनमधील इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आर्यंलडमध्ये लस देण्यास सुरुवात होणार आहे. वाचा: लस कोणाला देणार? ब्रिटनमधील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केअर होममध्ये राहणारे वयस्कर मंडळी, आरोग्य कर्मचारी, आरोग्य स्वयंसेवक आदींना लस देण्यात येणार आहे. त्याशिवाय ८० वर्ष व त्याहून अधिक वय, त्यानंतर ७५ वर्ष व त्याहून वय, ६५ वर्ष व त्याहून अधिक वय, ६० व त्याहून अधिक वय असलेल्या वयोगटातील व्यक्तिंना या प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. त्याशिवाय १६ ते ६४ या वयोगटात ज्यांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असेल त्यांनाही लस देण्यात येणार आहे. वाचा: लसीमुळे धोका? लस चाचणीत कोणत्याही स्वयंसेवकांवर कोणतेही गंभीर साइड इफेक्ट जाणवले नाहीत. काहीजणांना अंगदुखी, सौम्य ताप येणे आदी लक्षणे दिसून आलीत. मात्र, चिंता करणारे एकही कारण नव्हते. लस दिल्यानंतर त्या व्यक्तिंना किमान १५ मिनिटे लसीकरण केंद्रावर थांबावे लागणार आहे. एखाद्या व्यक्तिला साइड इफेक्ट्स जाणवल्यास त्याची नोंद करण्यात येणार आहे. लस कशी देणार? फायजरच्या लशीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २१ दिवसांनी देण्यात येणार आहे. इंजेक्शनद्वारे ही लस दिली जाईल. एकदा लस घेतल्यानंतर कमीत कमी सहा महिने शरीरात रोगप्रतिकारक शक्ति असणार आहे.