धक्कादायक! आंतरजातीय विवाह, दाम्पत्यावर सामाजिक बहिष्कार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 21, 2020

धक्कादायक! आंतरजातीय विवाह, दाम्पत्यावर सामाजिक बहिष्कार

https://ift.tt/3rg6pcb
म. टा. वृत्तसेवा, पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारी घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. प्रेमप्रकरणातून दुसऱ्या समाजाच्या मुलीशी लग्न करून घरी नांदायला घेऊन आणणे एका प्रियकराला महागात पडले आहे. कतिया समाजाच्या लोकांनी या नवदाम्पत्याला समाजातून बहिष्कृत केले आहे. इतकेच नव्हे, तर दंडरूपाने ५० हजार ते एक लाख रुपये भरण्याचे फर्मान काढले आहे. गोंदिया तालुक्यातील जरताळ येथील कतिया समाजाच्या एका तरुणाने नागपूर येथील तरुणीशी केला. हा विवाह १७ ऑक्टोबर २०२० रोजी झाला. विवाहानंतर ९ डिसेंबरला नवदाम्पत्य आपल्या गावी परतले. त्यानंतर १५ डिसेंबरला आपल्या जातीतील मुलाने दुसऱ्या जातीच्या मुलीशी विवाह केला म्हणून गावात शिक्षेसाठी कतिया समाजाची बैठक झाली. यात दंडरूपात ५० हजार ते एक लाख रुपये रक्कम बोलली गेली. मात्र, आपण गरीब असल्याने केवळ एक हजार रुपये भरू शकत असल्याचे या तरुणाने समाजाच्या पंचांना सांगितले. तरुणाच्या मित्राने समाजाच्या बैठकीत आता सर्वत्र आंतरजातीय विवाह करणे ही प्रथा सुरू असल्याचे सांगितले, तसेच केवळ ५० रुपये दंड घेऊन नवदाम्पत्यांना माफ करावे, अशी विनंती केली. मात्र, समाजातील लोकांनी मदत करणाऱ्या मित्रालाच मारहाण केली. अखेर दंडाचे पैसे भरू न शकल्यामुळे नवदाम्पत्य आणि त्यांच्या कुटुंबाला कतिया समाजाने बहिष्कृत केले. त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांनाही घरी प्रवेश नाकारण्यात आला आहे. या प्रकरणी तरुणाच्या मित्राच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलिस स्टेशन येथे तीन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.