५० वर्षांवरील नागरिकांना मार्चपासून लस : डॉ. हर्षवर्धन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 7, 2021

५० वर्षांवरील नागरिकांना मार्चपासून लस : डॉ. हर्षवर्धन

https://ift.tt/3oSjZjL
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : '५० वर्षांवरील आणि इतर व्याधीग्रस्त व्यक्तींचा समावेश असलेला कोव्हिड लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे,' अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी शनिवारी लोकसभेत दिली. 'या टप्प्यात २७ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल,' असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. वर्धन यांनी सांगितले, की आतापर्यंत देशात ५० लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 'देशात १६ जानेवारीला लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात करोना योद्धे मिळून तीन कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मार्चमध्ये कोणत्याही आठवड्यात तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करता येईल. त्याची नेमकी तारीख तूर्त सांगता येणार नाही.' 'लसीकरणासाठी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि गरज पडल्यास त्यात वाढ करण्याचे आश्वासनही दिले आहे,' असेही डॉ. वर्धन यांनी सांगितले. 'आणखी सात लशींवर संशोधन' 'देशात सध्या सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकने विकसित आणि उत्पादित केलेली कोव्हॅक्सिन या दोन लशींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. याखेरीज अन्य सात लशी संशोधनाच्या टप्प्यात आहेत. त्यातील तीन लशींच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. दोन लशींच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. अन्य दोन लशी विकसनाच्या टप्प्यावर आहेत,' अशी माहिती डॉ. वर्धन यांनी दिली. '१५ देशांना ६१ लाख लशी' 'भारताकडे २२ देशांनी लशींची मागणी नोंदवली. यात अफगाणिस्तान, अल्जीरिया, बांगलादेश, भूतान, ब्राझील, इजिप्त, कुवैत, मालदीव, मॉरिशस, मोरोक्को, म्यानमार, नेपाळ, निकारागुआ, ओमान, सौदी अरेबिया, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरील काही देशांचा समावेश आहे. त्यातील १५ देशांना मदत किंवा करार अशा स्वरूपात लशी पुरविण्यात आल्या. त्यातील ५६ लाख लशी मदतीच्या रूपात आणि पाच लाख करारानुसार देण्यात आल्या आहेत,' असेही डॉ. वर्धन यांनी सांगितले. देशात ११, ७१३ नवे बाधित देशातील एकूण करोनाबाधितांचा आकडा १ कोटी ०८ लाख १४ हजार ३०४वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत ११७१३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. आजपर्यंत १ कोटी ०५ लाख १० हजार ७९६ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१९टक्के झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या १ लाख ४८ हजार ५९० करोनाबाधित सध्या उपचार घेत आहेत. २४ तासांत ९५ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १ लाख ५४ हजार ९१८ जणांनी जीव गमावला आहे. लसीकरणाचा वेग वाढवा देशभरात ५६ लाखांहून अधिक नागरिकांचे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. तसेच लस घेतलेल्यांमध्ये कोणतेही विपरित परिणाम आढळले नसल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचा वेग वाढवण्याची विनंती केंद्र सरकारने शनिवारी केली आहे. २० फेब्रुवारीपर्यंत सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा किमान एक डोस घेतलेला असावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. तर १६ जानेवारीला लसीकरणाच्या पहिल्या दिवशी डोस घेतलेल्यांनी १३ फेब्रुवारीपासून दुसरा डोस घेण्यास सुरुवात करावी, असेही सांगण्यात आले आहे.