मुंबई : भांडवली बाजाराने आज आठवड्याची सुरुवात दणक्यात केली आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी वाढ झाली आहे. रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या उपायोजना आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण यामुळे गुंतवणूकदारांची चिंता दूर झाली आहे. त्यांनी बाजारात चौफेर खरेदीचा सपाटा लावला आहे. आज बाजार उघडताच सेन्सेक्सने ३५० अंकांची झेप घेतली तर त्यापाठोपाठ निफ्टीने १०० अंकांची वाढ नोंदवली. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७२१ अंकांनी वधारला आणि तो ४८६०० अंकांवर आहे. तर निफ्टी २०३ अंकांनी वाढला असून १४५४४ अंकांवर आहे. या तेजीच्या लाटेत गुंतवणूकदारांची मालमत्ता दीड लाख कोटींनी वाढली असल्याचा अंदाज शेअर दलालांनी व्यक्त केला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर ३० पैकी २५ शेअर तेजीत आहेत. ज्यात बँका, ऑटो, वित्तसंस्था, आयटी कंपन्या आणि धातू क्षेत्रातील महत्वाच्या शेअरला मागणी आहे. आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, कोटक बँक, इंडसइंड बँक, एशियन पेंट, एचडीएफसी बँक, टीसीएस, मारुती या शेअरमध्ये वाढ झाली आहे. एनटीपीसी, पॉवरग्रीड, सन फार्मा, टेक महिंद्रा, एचसीएल टेक या या शेअरमध्ये आज घसरण झाली आहे. करोना संकट असून देखील आयसीआयसीआय बँकेने सर्वच विभागात दमदार कामगिरी केली. याचा फायदा बँक निफ्टीला झाला असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर बाजार विश्लेषक व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले कि एप्रिलमध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा ठेवला होता. मात्र स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या तुलनेत परदेशी गुंतवणूकदारांनी त्याची भरपाई केली आहे. आज एचडीएफसी लाईफ, टेक महिंद्रा, कॅस्ट्रोल इंडिया, अलोक इंडस्ट्रीज या कंपन्या आर्थिक निकाल जाहीर करणार आहेत. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अमेरिकेतील तेजीचे पडसाद आज आशियातील भांडवली बाजारांवर उमटले. सिंगापूर, चीन, कोरिया आणि हाँग काँग या भांडवली बाजारांमध्ये तेजी आहे. देशात, रविवारी (२६ एप्रिल २०२१) रोजी एकूण ३ लाख ५२ हजार ९९१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कालच्या २४ तासांत देशात तब्बल २ हजार ८१२ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात रविवारी एकूण २ लाख १९ हजार २७२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ९५ हजार १२३ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.