
नवी दिल्ली : देशात सुरू असलेल्या करोना लसीकरण मोहिमेदरम्यान गर्भवती स्त्रियांसाठी, स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आणि लहान मुलांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध नाही. भारतात अद्याप कोविड लसीच्या कोणत्याही क्लिनिकल ट्रायलमध्ये अद्याप गर्भवती स्त्रियांना समाविष्ट करण्यात आलेलं नाही. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना धोका असल्यानं त्यांना लस दिली जाऊ नये, असे आदेश सरकारनं दिले आहेत. परंतु, कोविड विषाणू मात्र कुणालाही सोडत नाही की कुठलाही भेदभाव करत नाही. राजधानी दिल्लीत एका गर्भवती डॉक्टरला आपल्या पोटातल्या बाळासहीत आपले प्राण गमवावे लागल्याची घटना नुकतीच समोर आलीय. डॉक्टर महिलेच्या पतीनं सोशल मीडियावर तिचा एक शेवटचा व्हिडिओ संदेश जारी केलाय. या व्हिडिओत डॉक्टर महिलेनं लोकांना जबाबदारीनं वागण्याचा संदेश दिला आहे. ( 19) दातांची डॉक्टर असलेल्या डॉ. यांचं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं करोनाशी युद्ध अखेर संपुष्टात आलंय. डॉ. डिंपल आणि त्यांच्या अजूनही या जगात पाऊल न ठेवलेल्या बाळाचा या युद्धात पराभव झालाय. डॉ. डिंपल या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. एप्रिल महिन्यात त्या करोना संक्रमित असल्याचं चाचणीतून स्पष्ट झालं होतं. दोन आठवड्यानंतर ३४ वर्षीय डिंपल यांनी आपल्या पोटातील भ्रूणाला गमावलं आणि पुढच्याच दिवशी डिंपल यांनीही आपले प्राण सोडले. पती आणि तीन वर्षांच्या मुलाला सोडून डॉ. डिंपल यांनी या जगाचा निरोप घेतलाय. कोविड संक्रमित आढळल्यानंतर १० दिवसांनी २१ एप्रिल रोजी डिंपल यांची ऑक्सिजन पातळी घसरणं सुरू झालं होतं. त्यांना ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांना रेमडेसिविर तसंच दोन वेळा प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली. २५ एप्रिल रोजी त्यांना प्रसववेदना जाणवू लागल्या. अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भातील बाळाचं हृदय बंद झाल्याचं स्पष्ट झालं. गर्भातच बाळाचा मृत्यू झाला होता. मातेला इजा होऊ नये यासाठी डॉक्टरांनी सीझेरियन करून गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. परंतु, दुसऱ्याच दिवशी सकाळी डॉ. डिंपल यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांचे पती रविश चावला यांनी दिली. आपल्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी डॉ. डिंपल यांनी आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रमंडळींसाठी एक व्हिडिओ संदेश दिला होता. यामध्ये त्यांनी या घातक विषाणूला मस्करीत न घेण्याचा सल्ला दिला होता. हा व्हिडिओ त्यांचे पती रविश चावला यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत 'कोविडला हलक्यात घेऊ नका. घरात किंवा घराबाहेर इतरांशी गप्पा मारताना मास्क परिधान करा. जबाबदारीनं घराच्या बाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी याची काळजी घ्या. आपल्या घरात लहान मुलं, गर्भवती स्त्रिया, वयोवृद्ध व्यक्ती आहेत. त्यांना करोनाचा सर्वाधिक धोका आहे. मी त्याचा सध्या अनुभव घेतेय, अशा पद्धतीच्या त्रासातून कधीही गेले नव्हते', असं म्हणत डॉ. डिंपल यांनी आपल्या या व्हिडिओत लोकांना जबाबदारीनं वागण्याचा सल्ला दिला आहे. कोविडमुळे मी माझ्या पत्नीला आणि या जगात पाऊलही न ठेवणाऱ्या बाळाला गमावलंय. परंतु, पत्नी डिंपल यांच्या भावनांचा सन्मान करण्यासाठी आणि कोविडविषयी निर्माण करण्यासाठी आपण त्यांचा हा अखेरचा व्हिडिओ शेअर करत असल्याचं रविश चावला यांनी म्हटलंय.