
अमरावती : राज्यात करोना धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात मृतसंख्या वाढली. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेला गांभीर्याने घेत त्यासाठी आतापासून तयारी केली पाहिजे अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. यासाठी त्यांनी एक व्हीडिओ जारी करत राज्य आणि केंद्र सरकारला विनंती केली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वयोवृद्धांचा मृत्यूदर जास्त होता. आता दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांचा मृत्यूदर जास्त आहे. त्यात आता लहान मुलांमध्ये करोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरेल त्यामुळे यासाठी सरकारने आतापासून तयारी करणं महत्त्वाचं आहे असं नवणीत राणा यांनी म्हटलं आहे. सद्या कोरोनाची लागण झपाट्याने वाढत असल्याने सरकार लसीकरनावर जास्त भर देत आहे. तिसरी लाट ही लहान मुलांकरिता धोकादायक आहे. म्हणून लहान मुलांचंसुद्धा लसीकरण व्हायला पाहिजे. त्यामुळे सरकारनेसुद्धा याचा विचार करावा सोबतच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याची काळजी घ्यावी अशी विनंती खासदार नवनीत राणानी केली. तिसऱ्या लाटेसाठी राज्यभरात प्रत्येक ठिकाणी लहान मुलांसाठी १ हजार बेड्सचं कोविड सेंटर असलं पाहिजे. तिथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याची उत्तम सुविधा असावी असंही नवणीत राणा यांनी म्हटलं आहे. करोनाची तिसरी लाट कुठल्याच राज्यात येऊ नये, पण जर आली तर त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे असं यावेळी राणा म्हणाल्या. करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलंनाही संसर्ग होण्याचा अधिक धोका आहे. पण तिसरी लाट रोखताही येऊ शकते. ही लाट रोखण्यासाठी आपल्याला वेगाने लसीकरण मोहीम राबवावी लागणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण झाल्यास करोना व्हायरसचे धोकादाय स्वरुप बदलेल आणि त्याला आटोक्यात आणण्यात आपल्याला यश येईल. तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी अधिक खबदारी घेऊन जागरूक राहण्याची गरज आहे.