नंदीग्राम: पश्चिम बंगालमधील सर्वात प्रतिष्ठेच्या मतदारसंघात मतमोजणी सुरू आहे. या ठिकाणी दोन जुन्या सहकाऱ्यांमध्ये काट्याची टक्कर आहे. एकीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दुसरीकडे तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपत गेलेले सुवेंदू अधिकारी आहेत. ममतांनी सुवेंदूंना आव्हान देण्यासाठी भवानीपूर मतदारसंघ सोडून नंदीग्राममध्ये लढल्या. आता मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. सकाळी ९.२७ मिनिटे - पहिल्या फेरीत सुवेंदू १५०० मतांनी आघाडीवर पश्चिम बंगालमधील महत्वाच्या जागांपैकी नंदीग्राममधून भाजपचे सुवेंदू अधिकारी सातत्याने आघाडीवर आहेत. ममता बॅनर्जींना मागे टाकतानाच, सुवेंदू अधिकारी यांनी पहिल्या फेरीत १५०० मतांनी आघाडी घेतली आहे. बंगालच्या सुरुवातीच्या टप्प्यात तृणमूल काँग्रेसने १२५ जागांवर आघाडी घेतली होती. मात्र, नंदीग्राममध्ये भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरची जागा सोडून नंदीग्रामची निवड केली होती. नंदीग्राममध्ये २००९ पासून तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात येणाऱ्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघावर २००९ पासून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. २०१६ मध्ये नंदीग्राममध्ये एकूण ८७ टक्के मतदान झाले होते. २०१६मध्ये टीएमसीचे सुवेंदू अधिकारी यांनी सीपीएमचे अब्दुल कबीर सेख यांना ८१२३० मतांच्या फरकाने पराभूत केले होते. नंदीग्राममध्ये आठ उमेदवार मैदानात नंदीग्राममधून आठ उमेदवार रणमैदानात आहेत. ममता आणि सुवेंदू अधिकारी यांना सीपीएमच्या मीनाक्षी मुखर्जी टक्कर देतील. याशिवाय सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट) चे मनोज कुमार दास आणि अपक्ष उमेदवारांमध्ये दीपक कुमार गायेन, सुब्रत बोस, एसके सद्दाम हुसैन आणि स्वपन परुआ हे देखील मैदानात आहेत.