तिसरी लाट रोखण्यास लसीकरणाचाच पर्याय, तज्ज्ञांचं मत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 10, 2021

तिसरी लाट रोखण्यास लसीकरणाचाच पर्याय, तज्ज्ञांचं मत

https://ift.tt/3tBRDwi
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलेले असतानाच आता तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आणि तिचा प्रभाव कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येचे लसीकरण गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये नव्याने चार लाख तीन हजार ७३८ जणांना नव्याने करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या दोन कोटी २२ लाख ९६ हजार ४१४वर पोहोचली आहे. त्याच वेळी देशात ४,०९२ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्युमुखींची संख्या दोन लाख ४२ हजार ३६२वर पोहोचली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत असल्याने करोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक भयंकर असल्याचेही निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये पहिल्या लाटेला सुरुवात झाली, ती यंदा फेब्रुवारीपर्यंत कायम होती, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पहिली लाट थंडावल्यानंतर सर्वच यंत्रणांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच दुसऱ्या लाटेने डोके वर काढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, दुसऱ्या लाटेचे खापर अन्य म्युटंटवर फोडल्याचेही निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. केंद्र सरकारचे मुख्य आरोग्य सल्लागार के. विजयराघवन यांनी गेल्या आठवड्यात तिसरी लाट अपरिहार्य असून, तिच्यामुळे अधिक नुकसान होऊ नये यासाठी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते. 'तिसरी लाट रोखायची असेल, तर अधिक कडक आवश्यक आहे. केंद्र सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची कशी अंमलबजावणी होते, यावर तिसऱ्या लाटेचे नुकसान अवलंबून आहे,' असेही मत के. विजयराघवन यांनी व्यक्त केले. लस घेण्याशिवाय पर्याय नाहीच काही तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्यायच उरलेला नाही. मोठ्या प्रमाणावर लोकांनी लस घेतल्यास त्यांच्या शरिरात निर्माण झालेली प्रतिपिंडे लाटेला रोखण्यासाठी मदत करतील. त्यामुळे आगामी काळात लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक असल्याचेही मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले.