मुंबई- करोनाकाळात एकीकडे सगळ्यांनाच आजाराचा धोका सतावत आहे तर दुसरीकडे कित्येकांना एका वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. मागील वर्षीच्या लॉकडाउनमध्ये अनेक छोट्या कलाकारांनी फळं- भाज्या आणि राख्या विकून दिवस काढले होते. त्यावेळेसही कित्येकांसमोर जगायचं कसं असा प्रश्न उभा राहिला होता. आताही अनेक कलाकार त्याच परिस्थितीला सामोरे जात आहेत. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील अभिनेते हेदेखील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत आहेत. एकीकडे अतुल यांना काम मिळत नाहीये तर दुसरीकडे त्यांच्या मुलाला एलन हर्नडोन डडली सिण्ड्रोम या दुर्धर आजाराने ग्रासलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अतुल म्हणाले, 'लॉकडाउनमुळे माझंच नाही तर सगळ्यांचं नुकसान झालंय. पण माझी अडचण थोडी वेगळी आहे. माझ्यावर माझ्या मुलाची जबाबदारी आहे जो अत्यंत गंभीर आजाराने गासलेला आहे. माझा मुलगा बाकी मुलांसारखा उभा राहू शकत नाही, कोणतंही काम करू शकत नाही. तो नेहमी बेडवर झोपलेला असतो. या आजारावर भारतात कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. त्यासाठी मला नेदरलॅण्डहून औषधं मागवावी लागतील. हा देश त्या देशांपैकी एक आहे जो एलन हर्नडोन डेडली सिण्ड्रोम आजारावर औषध तयार करतो.' कलाकारांकडून मदतीची अपेक्षा करत ते म्हणाले, 'मी अनेक मालिकांमध्ये काम केलं. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्येही काम करतोय. अनेक कलाकार आहेत जे मला मदत करतायत. पण त्यांची मदत पुरेशी नाहीये. यापूर्वीही आर्थिक अडचणीमध्ये मी दारोदार जाऊन अगरबत्त्या विकल्या आहेत. वृत्तपत्र विकली आहेत. मी आताही खूप मेहनत करण्यासाठी तयार आहे जेणेकरून मी एवढे पैसे जमा करू शकेन ज्यामुळे माझा मुलगा पूर्णपणे ठीक होईल. डॉक्टरांनी आम्हाला कुठेही बाहेर जाण्यापासून मनाई केली आहे. जेणेकरून माझ्या मुलाला करोनाची लागण होणार नाही.' काय आहे AHDS (एलन हर्नडोन डडली सिण्ड्रोम) हा आजार विशेषतः मेंदूवर आघात करतो ज्यामुळे मेंदूच्या कवटीची वाढ पूर्णपणे होत नाही. त्यामुळे मेंदूच्या काही नसा आकुंचित राहतात. त्याचा परिमाण म्हणून बाळाच्या डोक्याची वाढ पूर्ण होत नाही. स्नायू आकुंचन पावतात. हाडांची वाढ पूर्णपणे होत नसल्याने शरीर अशक्त होतं. काही बालकांमध्ये बोलता न येणे मानेच्या स्नायूंची अरुंद वाढ असे परिणाम दिसून येतात.