भयंकर! आई होण्याआधीच महिलेचा पोटातल्या बाळासह मृत्यू, कारण वाचून काळजाचा ठोका चुकेल! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 12, 2021

भयंकर! आई होण्याआधीच महिलेचा पोटातल्या बाळासह मृत्यू, कारण वाचून काळजाचा ठोका चुकेल!

https://ift.tt/3hjPX8h
गडचिरोली : करोनाच्या भीषण संकटामध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यूचा तांडव सुरू असताना गडचिरोलीमध्ये काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार समोर आला आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे नऊ महिन्याच्या गर्भवतीसह बाळाचा मृत्यू झाल्याची घटना 9 मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या कोर्ला गावात हा प्रकार समोर आला आहे. पुष्पा राकेश वेलादी वय (23) असं त्या मृत महिलेचं नाव आहे. तिची ही पहिलीच प्रसूती होती. मिळालेल्या माहितीनुसार पुष्पा राकेश वेलादी ही मूळची सिरोंचा तालुक्यातील कोर्ला या अतिदुर्गम गावातील रहिवासी असून तिचे लग्न लगतच्या छत्तीसगड राज्यातील कोत्तागुडम इथं झालं. आदिवासी रिवाजाप्रमाणे बाळंतपणासाठी ती आपल्या माहेरी कोर्ला इथं आली होती. 9 मे रोजी रविवारी पहाटेच्या 3 वाजताच्या दरम्यान तिला प्रसुतीकळा सुरू झाल्या. यावेळी गरोदर महिलेच्या भावाने त्याच क्षणी गावातील उपकेंद्रात जाऊन नर्सला माहिती दिली. मात्र, ती तिने उशिरा येऊन सलाईन लावल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याने रविवारी सकाळी दुचाकीने जवळपास 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या झिंगानूर गाठून रुग्णवाहिका आणली आणि परत प्रसूतीसाठी झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र, झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदयकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून लगेच उपजिल्हा सामान्य रुग्णालय अहेरी इथं जाण्यास सांगितलं. झिंगाणूर ते अहेरीचं अंतर जवळपास 90 किलोमीटर आहे. इतकंच नाही तर सगळ्या रस्त्यांवर खड्डे आहेत. यामुळे गर्भवती महिलेची प्रकृती अधिकच खराब झाली. महिलेसोबत बाळाचा मृत्यू कसेबसे तिला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. इथल्या डॉक्टरांनी तिला लगेच ऑक्सिजन लावून उपचार करण्यास सुरुवात केली पण तोच महिलेने अखेरचा श्वास घेतला. महिलेला तिच्याच गावात योग्य उपचार मिळाले असते तर आज हा नाहक बळी गेला नसता. सगळ्यात गंभीर म्हणजे यामध्ये महिलेच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे गडचिरोली जिल्ह्यात याआधीही एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात अश्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, दुर्गम भागात अजूनही आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकली नाही. इतकंच नाहीतर स्थानिक पातळीवर काम करणारे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने गरोदर मातांची योग्य नोंदणी आणि तपासणी होतं नसल्याची बोंब सुरू आहे. भ्रमणध्वनी सेवेचा अभाव, रस्त्यांची दुर्दशा, रुग्णवाहिकेचा अभाव, रिक्त पदांचा डोंगर अशा अनेक समस्यांमुळे ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. आजवर अनेक लोकांना उपचाराविना आपले प्राण गमवावे लागले असल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर सरकारनं तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.