नवी दिल्ली : देशात करोना संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात काही चांगले संकेतदेखील मिळत आहेत. अनेक राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत लॉकडाऊन आणि तत्सम निर्बंधांमुळे करोना संक्रमितांच्या संख्येत मोठा परिणामही दिसून येतोय. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत करोना संक्रमितांची दररोजची संख्या घटताना दिसतेय.बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मंगळवारी (११ मे २०२१) ३ लाख ४८ हजार ४२१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ५५ हजार ३३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एका दिवसात ४२०५ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ३३ लाख ४० हजार ९३८ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ५४ हजार १९७ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ९३ लाख ८२ हजार ६४२ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३७ लाख ०४ हजार ०९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ३३ लाख ४० हजार ९३८
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ९३ लाख ८२ हजार ६४२
- उपचार सुरू : ३७ लाख ०४ हजार ०९९
- एकूण मृत्यू : २ लाख ५४ हजार १९७
- करोना लसीचे डोस दिले गेले : १७ कोटी ५२ लाख ३५ हजार ९९१