उष्णतावाढीमुळे पावसाचा शिडकावा; मुंबई, ठाण्यात शनिवारी मुसळधार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 7, 2021

उष्णतावाढीमुळे पावसाचा शिडकावा; मुंबई, ठाण्यात शनिवारी मुसळधार?

https://ift.tt/3qYDM3G
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः राज्याच्या काही भागांमध्ये मान्सून अपेक्षित पद्धतीने सक्रीय नसताना पाऊस पडत आहे. मुंबईमध्येही मंगळवारी तुरळक ठिकाणी शिडकावा झाला. तापलेल्या वातावरणामुळे काही ठिकाणी राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये आलेला पावसाचा अनुभवही असाच होता. पावसाचा शिडकावा सुरू झाल्यावर मुंबईकरांना आता उकाड्यापासून सुटका होईल अशी आशा निर्माण झाली होती, मात्र किचिंतसा पाऊस पडल्यानंतर पुन्हा एकदा उन्हे तापली. मुंबईत कुलाबा येथे मंगळवारी कमाल तापमान ३२ अंश नोंदले गेले, तर सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत १५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३२.७ अंश सेल्सिअस होते, तर दिवसभरात १७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईत अनेक ठिकाणी दिवसभरात ५ मिलीमीटरपर्यंत पावसाची दिवसभरात नोंद झाली. वरळी, दादर अशा भागात इतर भागांपेक्षा थोड्या अधिक पावसाची नोंद झाली. मात्र काही काळ पडल्यानंतर हा पाऊस गायब होऊन पुन्हा एकदा ऊन पडले आणि अधिक उकाडा जाणवू लागला. नवी मुंबईमध्येही एखाद-दुसऱ्या ठिकाणी एखादी सर येऊन नंतर पुन्हा काहिली जाणवू लागली. मात्र या पावसाने जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलै सुरू झाल्यानंतर अनेक दिवसांनी मुंबईकरांना पावसाळा सुरू असल्याची आठवण करून दिली. या आठवड्यामध्ये मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा अधिक सक्रीय होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्रात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांमध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथेही बुधवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथे बुधवारी आणि गुरुवारी तसेच शुक्रवारी आणि शनिवारी अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात शनिवारी मुसळधार? मंगळवारी जारी झालेल्या पूर्वानुमानानुसार, सिंधुदुर्गमध्ये शनिवारपर्यंतच्या पाच दिवसांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रत्नागिरीमध्ये गुरुवारपासून, तर रायगडमध्ये शुक्रवार-शनिवार या दोन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.