
म. टा. प्रतिनिधी वांद्रे : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये () पुढील चार ते पाच वर्षांत ५० लाख चौरस फूट क्षेत्रफळावर व्यावसायिक कार्यालयांची उभारणी होत आहे. त्यामुळे तेथे आणखी किमान ५० हजार नोकऱ्या तयार होऊ शकतात, असे सीआरई-मॅट्रिक्स या सर्वेक्षण संस्थेच्या अभ्यासातून समोर आले आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले बीकेसी हे मुंबईचे आता महत्त्वाचे व्यवसाय केंद्र ठरले आहे. राष्ट्रीय शेअर बाजारासह हिऱ्यांवर पैलू पाडणारी जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनची प्रशिक्षण संस्था, निर्यात केंद्र तसेच विविध बँकांची मुख्यालये, ओटीटी चालविणाऱ्या कंपन्यांची मुख्यालये यामुळे बीकेसीचे महत्त्व वाढत गेले आहे. त्यातच आता आणखी काही व्यावसायिक जागा मोठ्या प्रमाणात उभ्या होत असल्याचे सीआरई-मॅट्रिक्सने त्यांच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. याबाबत सीआरई-मॅट्रिक्सचे अभिषेक गुप्ता यांनी सांगितले की, 'सद्यस्थितीत बीकेसीमध्ये जवळपास १.८० कोटी चौरस फुटावर व्यावसायिक प्रतिष्ठाने उभी झाली आहेत. येथील जागेला सध्या देशातील सर्वाधिक भाडेपट्टीचा दर आहे. सेबी, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, ओएनजीसी यामुळे बीकेसीचे महत्त्व अपार झाले आहे. त्यातच आता जिओचे जागतिक केंद्र ७० लाख चौरस फुटावर येणे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामध्ये कार्यालयीन जागा, आलिशान मॉल्स, हॉटेल्स, नाट्यगृह आदी सारे काही असेल.' मुंबईतील मध्यवर्ती व्यवसाय जिल्हा मुंबईचे व्यवसाय केंद्र म्हणून याआधी दक्षिण मुंबई व त्यातही नरिमन पॉइंटची ओळख होती. बीकेसीने ही ओळख बदलली. बीकेसीत येणाऱ्या उद्योगांची संख्या वाढल्याने आता त्याची ओळख मुंबईतील 'मध्यवर्ती व्यवसाय जिल्हा' अशी झाली आहे. काही वर्षे आधीपर्यंत ही ओळख नरिमन पॉइंटची होती, हे विशेष.